काष्टी : श्रीगोंदा तालुक्यातल घोड लाभक्षेत्रातील पिके पाण्याअभावी जळून चालली आहेत. पिण्याचा पाणी प्रश्न गंभीर बनत आहे. तरीही घोड धरणाचे आवर्तन लांबणीवर टाकण्यात आले आहे. धरणात पाणी शिल्लक असतानाही पिके का जाळताय? असा सवाल जिल्हा बँकेचे माजी संचालक शिवाजीराव पाचपुते व जिल्हा लेबर फेडरेशनचे संचालक अनिल पाचपुते यांच्यासह लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांनी केला आहे.
घोड धरण गेल्या वर्षी १०० टक्के भरले होते. धरणात सध्या चार टीएमसी उपयुक्त पाणीसाठा आहे. त्या परिस्थितीत तीन आवर्तने शेतीसाठी सुटू शकतात.
कालवा सल्लागार समितीची जलसंपदामंत्री जयंत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत १० फेब्रुवारीपासून पाणी सोडण्याचा निर्णय झाला. यामध्ये शेतकऱ्यांच्या भावना कुठे ही विचारात घेतल्या गेलेल्या दिसत नाहीत. ऊस, फळबागा इतर पिके पाण्याअभावी कोमेजू लागली आहे. ही पिके पाणी येईपर्यंत जळून जाण्याची शक्यता आहे.
त्यामुळे घोड धरणातून २० जानेवारीपासून पाणी सोडले, तरच लाभक्षेत्रातील पिके जिवंत राहतील. याबाबत कार्यकारी अभियंता स्वप्निल काळे यांनी तातडीने निर्णय घ्यावा, अन्यथा मढेवडगाव येथील जलसंपदा विभागाच्या उपविभागीय कार्यालयास शेतकरी टाळे ठोकतील, असा इशारा शिवाजीराव पाचपुते व अनिल पाचपुते यांनी दिला आहे.
हंगेवाडी परिसरात पाणीप्रश्न गंभीर बनला आहे. घोडचे आवर्तन आठ दिवसांच्या आत न सोडल्यास नगर-दौड रस्त्यावर रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा नागवडे साखर कारखान्याचे माजी संचालक भाऊसाहेब कोळपे यांनी दिला आहे.
----
तसा अहवाल पाठविणार
घोड कालव्यावरील पाणी वापर संस्था प्रतिनिधींनी आवर्तन लवकर सोडावे, याबाबत निवेदन दिले, तर आवर्तन नियोजनात बदल करावा, असा अहवाल वरिष्ठांना पाठविणार आहे.
-स्वप्निल काळे,
कार्यकारी अभियंता, कुकडी प्रकल्प विभाग २