लोकमत न्यूज नेटवर्क, संगमनेर: देशात कुठल्याही पक्षाचा अध्यक्ष निवडला जात असताना फारशी चर्चा होत नाही. मात्र, काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष निवडीवेळी मोठी चर्चा का होते?, तर भीती आहे. कारण काँग्रेसला नेहरु, गांधी घराण्याचा इतिहास आहे. हा इतिहास घराणेशाहीचा नसून बलिदानाचा इतिहास आहे. असे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजीमंत्री छगन भुजबळ म्हणाले.
स्वातंत्र्यसैनिक सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात, हरित क्रांतीचे प्रणेते डॉ. अण्णासाहेब शिंदे यांच्या संयुक्त जयंती महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. शुक्रवारी (दि.२३) येथील शेतकी संघाच्या प्रांगणात प्रेरणा दीन व पुरस्कार वितरण सोहळा पार पडला. त्यावेळी ते बोलत होते. राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत, काँग्रेस नेते, माजीमंत्री बाळासाहेब थोरात, आमदार डॉ. सुधीर तांबे आदी यावेळी उपस्थित होते.
अमृतवाहिनी शेती व शिक्षण विकास संस्थेच्या वतीने दरवर्षी पुरस्कारांचे वितरण करण्यात येते. सहकार, साहित्य, समाजसेवा, पर्यावरण, माध्यम क्षेत्रात उल्लेखनीय कार्याबद्दल यंदाचा स्वातंत्र्यसैनिक भाऊसाहेब थोरात स्मृती पुरस्कार ज्येष्ठ साहित्यिक व विचारवंत डॉ. आण्णासाहेब हरी साळुंखे यांना तर कृषी, शिक्षण, समाजसेवा, पर्यावरण क्षेत्रात उल्लेखनीय कार्याबद्दल दिला जाणारा यंदाचा डॉ. अण्णासाहेब शिंदे स्मृती पुरस्कार पर्यावरण तज्ज्ञ डॉ. सुधीर जगन्नाथ भोंगळे यांना तसेच सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सेवाभावी संस्थेच्या वतीने सहकारातील नेतृत्व पुरस्कार माजीमंत्री तथा विलासनगर (लातूर) येथील मांजरा सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष दिलीपराव दगडोजीराव देशमुख यांना प्रदान करण्यात आला.