------------------
औरंगाबादसोबतच अहमदनगरच्या नामकरणाचीही चर्चा अधूनमधून झडत असते. नामकरण केल्याने गतवैभव प्राप्त होणार का ? नामकरण केल्याने विकास आपोआप होईल का ? असे अनेक प्रश्न या निमित्ताने उपस्थित झाले आहेत. पाचशे वर्षांचा इतिहास असलेल्या ऐतिहासिक नगर शहराचे नाव बदलण्याची खरेच गरज आहे का ? याबाबतचे हे चिंतन.
---------------------------
आपले अहमदनगर भारतातील किंबहुना पहिले नियोजित शहर. अहमद निजामशाहने दक्षिण भारतातील आपल्या नवीन राजधानीसाठी अहमदनगरची निवड केली. कारण शहर निर्मितीसाठी हे ठिकाण आदर्श होते. शहर निर्माण, भौगोलिक, पर्यावरण आणि संरक्षणाच्या दृष्टीने अत्यंत उत्कृष्ट ठिकाण. जेंव्हा या शहराचे निर्माण कार्य पूर्ण झाले त्यावेळेस हे शहर एवढे अप्रतिम बनले की, तत्कालीन जगाच्या सर्वात सुंदर शहरांत अहमदनगरची गणना होऊ लागली.
अहमदनगर हे शहर निर्माणशास्त्राचा एक अद्वितीय नमुना. अहमदनगर येथील भुईकोट किल्ला, फरहत बाग, हस्त बेहिश्त महल, सलाबतखान महल अर्थात चाँद बीबी का महल, दमडी मस्जिद इत्यादी वास्तुकलेचे अप्रतिम उदाहरणे आहेत. युनेस्कोच्या वर्ल्ड हेरिटेज यादीमध्ये दमडी मस्जिदचा समावेश होतो, अशी गौरवशाली परंपरा नगरला लाभली आहे.
पुरोगामी विचारांचा पाईक. ज्या काळात महिलांना अगदी शिक्षणाचा अधिकार देखील नव्हता, त्या काळात अहमदनगरच्या सिंहासनावर एक महिला चाँद बीबी राज्य करीत होती. हीच परंपरा स्वातंत्र्य संग्रामात व त्यानंतरदेखील या शहराने जोपासली. या धरतीने देशाला छत्रपती शहाजी महाराज यांच्यासारखा शूरवीर आणि मलिक अंबरसारखा मुत्सद्दी दिला. ही धरती गंगा-जमुना संस्कृतीची साक्ष आहे. प्रसिद्ध सूफी संत हजरत शहाशरीफ, दमबारा हजारी, आनंदऋषी महाराज आणि मेहेरबाबांची ही कर्मभूमी.
अशा प्रकारे ऐतिहासिक, सामाजिक, सांस्कृतिक आणि आध्यात्मिक गौरवशाली परंपरेचे आम्ही अहमदनगरकर वारसदार आहोत, याचे निश्चितच आम्हाला अभिमान आहे; परंतु या अभिमानाची जागा आता खेदाने भरली जात आहे. कारण आम्ही आमची ही वैभवशाली परंपरा जपू शकलो नाही. कोणे एकेकाळी जगातील सर्वात अप्रतिम शहरात गणना होणारे हेच का ते अहमदनगर? स्वातंत्र्य संग्रामात आणि त्यानंतर अनेक सामाजिक आणि राजकीय आंदोलनात महाराष्ट्राला आणि संपूर्ण भारत देशाला दिशा देणारा आज स्वत: दिशाहीन झाला आहे. वास्तुशास्त्र, स्थापत्यशास्त्र, ध्वनिशास्त्र, जलसिंचन, शिक्षण आणि सांस्कृतिक क्षेत्रात पार जगाच्या नकाशावर स्वत:ला मिरविणारे हेच का ते अहमदनगर? असे अनेक प्रश्न एकामागून एक दृष्टिपटलावर येतात आणि शहराची वर्तमान अवस्था पाहून त्याचे भूतकालीन वैभव हे स्वप्न होते की काय, अशी शंका येते.
एकेकाळी जगाच्या नकशावर प्रसिद्ध असलेल्या या शहराची भारतात काय; परंतु महाराष्ट्राने दखल घेऊ नये, ही शोकांतिका आहे. आमच्या मागून औरंगाबाद, पुणे, नाशिक कधीचीच पुढे निघून गेली, याचा आम्हाला थांगपत्तादेखील लागू शकला नाही. शहराचे झालेले बकालीकरण, नांगरलेले रस्ते, ऐतिहासिक आणि पुरातन वास्तूची दुरवस्था, वाढलेले प्रदूषण, ढेपाळलेले नियोजन इत्यादींमुळे याला शहर म्हणायचे काय, हाच प्रश्न निर्माण होतो. अनेक जण तर याला मोठे खेडे संबोधतात. सातशे कोटींचे बजेट असलेली महापालिका कोट्यवधी रुपयांचा अहमदनगरच्या जनतेकडून वसूल केलेल्या या टॅक्सचा शेवटी वापर तरी कोठे करते ? हा यक्षप्रश्न नागरिकांना आहे. आत्मनिर्भर भारताच्या घोषणेला साद देऊन महापालिकेने देखील नागरिकांनी आत्मनिर्भर अर्थात ‘ज्यांनी त्यांनी आपापले पाहून घ्या,’ असे तर ठरविले नाही ना?
शहराच्या विकासाला पक्षाघात झाला की काय, की ज्यामधून हे शहर बाहेरच पडायला तयार नाही. एकीकडे शहराचे बकालीकरण होत असताना दुसरीकडे राजकीय नेतृत्व भावनात्मक मुद्दे उत्पन्न करून लोकांची विकासापासून दिशाभूल करण्याचा निरर्थक प्रयत्न करीत असल्याला प्रत्यय येतो. पुन्हा अहमदनगर शहरचे नाव बदलण्याचा केविलवाणा प्रयत्न सुरू करून लोकांचे लक्ष मूळ मुद्द्यापासून विचलित करण्याचा खटाटोप सुरू आहे.
वास्तविक पाहता जेंव्हा राज्यकर्ते जनतेच्या विकासाच्या अपेक्षा पूर्ण करण्यात अपयशी ठरतात तेंव्हा जनतेची दिशाभूल करण्यासाठी भावनात्मक मुद्दे उभे करून मूळ प्रश्नांना बगल दिली जाते. अर्थात भावनात्मक मुद्दे हे मूळ मुद्द्यांना संपूर्णपणे बगल देण्याची सोयीस्कर पळवाट आहे आणि सत्ता अपयशी ठरल्याचे द्योतक आहे.
शहराचे फक्त नाव बदल्याने त्याची स्थिती बदलेल काय? शहराच्या अधोगतीला त्याचे नाव कारणीभूत आहे काय की, शहराच्या कर्णधाराचे आपली गौरवशाली परंपरा शाबूत ठेवण्याचे अपयश? इतिहासात लोकांनी आपल्या कर्तृत्वामुळे अहमदनगरला जागतिक स्थान मिळवून दिले होते. आज आमच्या कर्तृत्वहीनतेचे दोष पूर्वजांना आपल्या देऊ शकतो काय?
वास्ताविक पाहता आजदेखील अहमदनगरला विकासाची अमर्याद संधी आहे. कारण उत्कृष्ट शहर निर्मितीला लागणारी सर्व क्षमता या धरतीत होती व आहे. विषय फक्त या क्षमताचे योग्य नियोजन करण्याचा आणि संधीचे सोने करण्याचा आहे. अहमदनगरला समृद्ध ऐतिहासिक वारसा असल्यामुळे हे शहर एक उत्कृष्ट पर्यटन स्थळ होऊ शकते. शहरातील ऐतिहासिक वास्तूंची देखभाल आणि जीर्णोद्धार केल्यास अहमदनगरवरून शिर्डी आणि शनिशिंगणापूरकडे जाणाऱ्या लाखो भाविकांना अहमदनगरमध्ये थांबविता येऊ शकते. यामुळे निश्चित येथील अर्थव्यवस्थेला उधाण येईल.
भौगोलिक आणि पर्यावरणाच्या दृष्टीने देखील अहमदनगरला एक असाधारण महत्त्व आहे. अहमदनगर हे दळणवळणाचे मध्यवर्ती ठिकाण आहे. एकीकडे पुणे, नाशिक आणि औरंगाबादसारखी महानगरे विकासाच्या दृष्टीने स्थिर होत असताना अहमदनगर पर्यटन, शिक्षण, आरोग्य, क्रीडा, सांस्कृतिक तसेच फळ प्रक्रिया इत्यादींचे केंद्र होऊ शकते.
अहमदनगर शहरात अपार प्रतिभा आहे. येथील विद्यार्थी, व्यावसायिक प्रत्येक क्षेत्रात आपली गुणवत्ता राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर सिद्ध करीत आहे. रोजगाराच्या संधी नसल्यामुळे नाईलाजाने हजारो तरुणांना रोजगारासाठी अहमदनगर सोडावे लागत आहे व होतकरू तरुणांच्या या स्थलांतरामुळे शहर ‘पेन्शनरचे गाव’ होईल की काय, अशी शंका निर्माण झाली आहे. अहमदनगर-पुणे शटल ट्रेन सुरू झाल्यास निश्चितच मोठ्या प्रमाणावर हे स्थलांतर थांबेल आणि तरुणांना शहरात राहूनच इतर शहरात व्यवसाय व रोजगार करता येईल.
अहमदनगर शहराला लाभलेल्या अशा अनेक सशक्त आणि सकारात्मक बाबींचा पुरेपूर सदुपयोग केल्यास निश्चितच भविष्यात आम्ही पुन्हा आपली गौरवशाली परंपरा जोपासू शकू. यासाठी दूरदर्शी आणि व्हिजनरी नेतृत्वाची आवश्यकता आहे. ज्या नेतृत्वात विकास करण्याची प्रबळ इच्छाशक्ती असेल व शहरावर अपार प्रेम असेल. याशिवाय सर्वांनी एकत्र येऊन प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे. नाव बदल्याने शहराचा विकास होत नाही तर विकास साधण्यासाठी मानसिकता बदलण्याची आवश्यकता असते. त्यामुळे नेतृत्वाने लोकांची दिशाभूल करण्यापेक्षा विकासाच्या अपार संधींकडे लक्ष द्यावे. विकासाचे नवीन पर्व अहमदनगरची वाट पाहत आहे.
(लेखक हे सामाजिक कार्यकर्ते व आर्किटेक्ट आहेत.)