अहमदनगर : लोकसभेची निवडणूक ही पक्षाची असली तरी, उमेदवारांची तुलना करण्याची संधी मतदारांसमोर आहे. संसदेमध्ये आपले प्रश्न कोण मांडतो याला महत्व आहे. मी घरातला की बाहेरचा या चर्चेला महत्व देण्यापेक्षा लोकांसाठी उपलब्ध होऊन, अभ्यास करुन प्रश्न सोडविणारा खासदार तुम्हाला हवा की, साडेचार वर्षात विधानसभेत फक्त दोन मिनिटे बोलणारा हवा याचा विचार करा, असे आवाहन महायुतीचे उमेदवार डॉ. सुजय विखे पाटील यांनी केले.नगर तालुक्यातील भोरवाडी, चास, सोनेवाडी, कामरवाडी, सारोळा कासार आणि अकोळनेर येथे त्यांनी मतदारांच्या भेटीगाठी घेऊन संवाद साधला. निवडणुकीतील भूमिका मतदारांसमोर मांडताना त्यांनी तालुक्यातील आणि मतदार संघातील विविध प्रश्नांवर भाष्य केले. प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी लोकसभेत अभ्यासूपणे प्रश्न मांडणारा खासदार पाठविणे गरजेचे असल्याचे ते म्हणाले.पद्मभूषण डॉ.बाळासाहेब विखे यांनीही दक्षिणेचे नेतृत्व करताना जनसामान्यांच्या प्रश्नांना प्राधान्य दिले. मात्र त्यांना काम करण्यासाठी कमी कालावधी मिळाला. त्यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी ही निवडणूक आहे. उत्तरेचे अतिक्रमण म्हणून आमच्यावर निरर्थक टीका केली जाते. पण अतिक्रमण करण्याची सवय कोणाची आहे? हे नगरकर चांगलेच जाणून आहेत. गुणे आयुर्वेद महाविद्यालयाचा इतिहास सर्वांच्या समोर आहे. या महाविद्यालयावर कोणी कसे अतिक्रमण केले हे जनता विसरलेली नाही. एक काळ आयुर्वेद महाविद्यालयाचा संपूर्ण राज्यात नावलौकिक होता. आज अवस्था काय आहे? एका राजकीय पक्षाचे कार्यालय म्हणून ते ओळखले जात असल्याची टीका विखे यांनी केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जलमंत्रालय स्थापन करण्याची घोषणा केली. याप्रसंगी रामदास भोर, संदेश कार्ले, बाळासाहेब हराळ, अरुण होळकर, राजेंद्र भगत, बाळासाहेब पोटघन आदी याप्रसंगी उपस्थित होते.
खासदार बोलणारा हवा की न बोलणारा : सुजय विखे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2019 12:02 PM