जामखेड : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मागील पाच वर्षांत देशाची वाट लावली. आता यापुढे ते तेच प्रकार करणार आहेत. त्यामुळे त्यांच्याकडून आणखी काय अपेक्षा करणार असा सवाल वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केला. पत्रकार परिषदेत आंबेडकर बोलत होते. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या २९४ व्या जयंतीदिनी वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी चौंडी येथे भेट दिली. यावेळी त्यांनी स्मृतीस्तंभास अभिवादन केले. अहिल्यादेवी होळकर यांच्या जन्मस्थळ दर्शन घेतले. यावेळी पालकमंत्री राम शिंदे, वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष अरूण जाधव, गोपीचंद पडळकर, अविनाश शिंदे, अक्षय शिंदे उपस्थित होते. आंबेडकर म्हणाले, भाजपला हटवण्यासाठी काँग्रेस, राष्ट्रवादी हा पर्याय नाही. राष्ट्रवादी काँग्रेस भेले असल्याने काँग्रेसमध्ये विलीन होणार आहे. मुस्लिम समाज त्यांच्याकडून निसटून चालला आहे. त्यांनी मुस्लिम समाजाचा फक्त मतासाठी वापर केला. त्यांच्यासाठी काही केले नाही. त्यामुळे ते आता वंचित आघाडीकडे आकर्षित होत आहेत. लोकसभेतील पराभवानंतर कॉंग्रेस, राष्ट्रवादीने विधानसभा निवडणुकीसाठी प्रस्ताव दिलेला नाही. दिला तरी त्यांच्याकडे जायचे कशासाठी ? वंचितसाठी काय अजेंडा त्यांच्याकडे आहे. तो अजेंडा असल्याशिवाय काही शक्य नाही. भाजप- सेना व काँग्रेस राष्ट्रवादीला पर्याय म्हणून वंचित बहुजन आघाडी हा पर्याय तयार झाला आहे. त्यामुळे आम्ही ठाम आहोत.
मोदी पुढील पाच वर्षात देशाची वाट लावणार - प्रकाश आंबेडकर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2019 3:08 PM