अहमदनगर : शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या शारीरिक शिक्षकांना बी. एड. प्रमाणे शैक्षणिक अर्हता वाढविता यावी म्हणून एमपीएड हा सुट्टीतील बहिस्थ अभ्यासक्रम यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठामार्फत सुरू करण्यात यावा, अशी मागणी क्रीडा भारती, राज्य क्रीडा शिक्षक महासंघ व राज्य समन्वय समिती यांच्या वतीने विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. के. वायुनंदन यांच्याकडे केली. त्यावर एमपीएड अभ्यासक्रम विद्यापीठात लवकरच सुरू करण्याचे आश्वासन त्यांनी दिले.
कुलगुरूंसोबत नाशिक विद्यापीठात बैठक झाली. एमपीएड संदर्भात लवकरच विद्यापीठाचे तज्ञ, शारीरिक शिक्षक संघटना यांची कोअर कमिटीसोबत बैठक करून अभ्यासक्रमाबाबत पुढील मार्गाक्रमण केले जाईल. यासाठी विद्यापीठाकडून सर्व सहकार्य करण्यात येईल व सुट्टीतील एमपीएड कोर्स लवकरच चालू करण्यात येईल, असे कुलगुरू यांनी राज्य पदाधिकाऱ्यांना आश्वासित केले. राज्यातील उपलब्ध पदे व स्थिती, बीपीएड कॉलेज, अभ्यासक्रम याबाबत संजय पाटील यांनी एमपीएड रेग्युलर कोर्स, अभ्यासक्रम, कालावधी, विषयरचनांबाबत अमोल जोशी यांनी, तर बहिस्थ एमपीएड कोर्सची आवश्यकता, प्रात्यक्षिक परीक्षा, अभ्यासकेंद्र या बाबत राजेंद्र कोतकर, दिनेश अहिरे यांनी सविस्तर माहिती बैठकीत दिली.
या वेळी क्रीडा भारतीचे विभागीय अध्यक्ष संजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शारीरिक शिक्षण व क्रीडा शिक्षक महासंघाचे राज्याध्यक्ष राजेंद्र कोतकर, ड्रॉपरोबॉलचे राज्य सचिव दिनेश अहिरे, सुनील गागरे, हिरामण शिदे, शंकर आहेर, युवा शारीरिक शिक्षक संघटनेचे अमोल जोशी, स्वप्निल करपे, सतीश कांबळे, संतोष लहाने, प्रणव अहिरे, चिन्मय देशपांडे, अक्षय गामने यांच्यासह राज्यभरातील विविध जिल्ह्यांतील पदाधिकारी उपस्थित होते.
-----------
फोटो - २१स्पोर्ट एमपीएड
हा सुट्टीतील बहिस्थ अभ्यासक्रम यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठामार्फत सुरू करण्यात यावा याबाबतचे निवेदन कुलगुरू डॉ. के. वायुनंदन यांना देताना संजय पाटील, राजेंद्र कोतकर व पदाधिकारी.