अहमदनगर : बनावट कागदपत्रांच्या आधारे कर्जवाटपप्रकरणी अहमदनगर शहर सहकारी बँकेचे अध्यक्ष, उपाध्यक्षांसह सर्व संचालक मंडळ व अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल आहे. या बँकेची आज (दि़२८) सायंकाळी ५ वाजता सावेडी येथील माऊली सभागृहात सर्वसाधारण सभा होत आहे. आता या सभेला संचालक मंडळ आणि अधिकारी उपस्थित राहणार का? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. सभेला उपस्थित राहिले तर पोलीसांकडून कारवाई होण्याची शक्यता आहे.सहकारी डॉक्टरांची फसवणूक करुन व त्यांच्या स्वाक्ष-या असलेली बनावट कागदपत्रे तयार करुन निलेश शेळके या डॉक्टरने येथील शहर सहकारी बँकेतून १७ कोटी २५ लाख रुपयांचे कर्ज घेऊन फसवणूक केल्याचे प्रकरण उघडकीस आले आहे. बँकेचे संचालक, अधिकारी, हॉस्पिटलला मशिनरी पुरवणाºया एजन्सी यांनी शेळके याच्याशी संगनमत केल्याचा आरोप आहे. त्यामुळे कोतवाली पोलीस स्टेशनला शेळकेसह २५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. हा गुन्हा शुक्रवारी आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला आहे़ पोलीस निरिक्षक प्रवीण भोसले हे या गुन्ह्याचा तपास करत आहेत.कर्ज घोटाळ्याप्रकरणी डॉ. रोहिणी भास्कर सिनारे (रा. राहुरी), डॉ. उज्ज्वला रवींद्र कवडे (रा. श्रीरामपूर) व डॉ. विनोद अण्णासाहेब श्रीखंडे यांनी स्वतंत्र फिर्यादी दाखल केल्या आहेत. फिर्यांदीपैकी प्रत्येकाची ५ कोटी ७५ लाख रूपयांची फसवणूक झाल्याची तक्रार आहे. याप्रकरणी डॉ. निलेश शेळके (रा. स्रेह बंगला, माणिकनगर, अहमदनगर) याच्यासह शहर सहकारी बँकेचे अध्यक्ष सुभाष चंदनमल गुंदेचा, उपाध्यक्ष सुजित श्रीकांत बेडेकर, संचालक मुकुंद घैसास (मयत), अशोक माधवराव कानडे, सुनील रामकृष्ण फळे, रावसाहेब जिजाबा अनभुले (मयत), सतीश दत्तात्रय अडगटला, मच्छिंद्र लक्ष्मण क्षेत्रे, संजय विठ्ठल घुले, गिरीश मुकुंद घैसास, डॉ़ विजयकुमार माणकचंद भंडारी, शिवाजी अशोकराव कदम, लक्ष्मण सहदेव वाडेकर(मयत), रेश्मा राजेश आठरे (चव्हाण), नीलिमा विश्वनाथ पोतदार, बाळासाहेब विठ्ठलराव राऊत, संजय प्रल्हाद मुळे यांच्यासह बँकेचे अधिकारी जवाहर हस्तीमल कटारिया, दिनकर यशवंत कुलकर्णी व कर्ज विभागाचे अधिकारी तसेच सी़ए़ विजय विष्णूप्रसाद मर्दा, बी़पी़ भागवत, निर्मल एजन्सीचे योगेश मालपाणी, जगदीश कदम, आऱटी़ कराचीवाला, मधुकर वाघमारे यांच्यावर गुन्हा दाखल आहे. बँकेचे पदाधिकारी आणि अधिकारी यांच्यावरच गुन्हा दाखल असल्याने सर्वसाधारण सभेवर पोलीसांचे सावट राहणार आहे.
अहमदनगर शहर सहकारी बँकेच्या सभेला संचालक उपस्थित राहणार का ? : पोलीसांचे सावट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 28, 2018 2:53 PM