संगमनेर : नैसर्गिक आपत्तीमुळे नूकसान झालेल्या फळबाग उत्पादक शेतकऱ्यांनाही शासन मदतीचा लाभ मिळाला पाहिजे. हवामानावर आधारीत फळपीक विमा योजनेतील निकषांच्या बदलासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडे पाठपुरावा करणार आहे, असे माजी मंत्री राधाकृष्ण विखे यांनी सांगितले.
नैसर्गिक आपत्तीमुळे नूकसान झालेल्या कुटुंबियांना शासन मदतीच्या धनादेशाचे वितरण रविवारी ( दि.२२) संगमनेर तालुक्यातील कनोली येथे आमदार विखे यांच्या हस्ते करण्यात आले.
आमदार विखे म्हणाले, हवामानातील बदलाचा होत असलेला परिणाम आता स्विकारावाच लागेल. नैसर्गिक आपत्तीने किंवा अतिवृष्टीने होणा-या नुकसानीला शासनाची मदत पुरेल अशीही परिस्थिती नाही. यासाठी हवामानावर आधारित पीक विमा योजना चांगल्या पध्दतीने आमलात आणणे हेच उत्तर आहे. या योजनेतील निकष शासनाने बदलल्याने बहुतांशी शेतकरी शासकीय मदतीपासून वंचित राहत आहेत. फळबागांच्या संदर्भातही या योजनेच्या मदतीचे सरकारचे कोणतेही धोरण नाही. त्यामुळेच हवामानावर आधारित पिक विमा योजनेतील बदलांबाबतच्या शिफारशी राज्य आणि केंद्र सरकारकडे आपण करणार आहोत.