कोपरगाव : तालुक्यात सध्या उन्हाची तीव्रता प्रचंड प्रमाणात वाढलेली आहे. त्यामुळे रब्बी हंगामातील पिके पाण्याअभावी सुकून चालली आहेत. दोन-तीन दिवसांत गोदावरी कालव्याद्वारे पाणी मिळाले नाही, तर सर्वच पिके नष्ट होण्याची भीती आहे. असे असतानाही पाटबंधारे विभाग पिके जळून गेल्यावर पाणी देणार आहे का? असा सवाल जिल्हा परिषद सदस्य राजेश परजणे यांनी केला आहे.
गेल्यावर्षी चांगला पाऊस झाल्याने दारणा व गंगापूर धरणात चांगला पाणीसाठा शिल्लक आहे. गोदावरी डाव्या आणि उजव्या कालव्यांना किमान दोन आवर्तने देता येतील अशी परिस्थिती आहे. गोदावरी कालव्यांच्या लाभक्षेत्रात उसाबरोबरच खोडव्याचे पीक प्रचंड प्रमाणात आहे. चारा व भाजीपाला तसेच उन्हाळी रब्बी पिके सध्या शेतात उभी आहेत. विजेच्या सततच्या लपंडावामुळे वीज मोटारी बंद असल्याने पिकांना पाणी देता येत नाही. काही ठिकाणची पाणी पातळी खालावल्याने विहिरी व कुपनलिका कोरड्या पडल्या आहेत. शेततळे, के. टी. वेअरमध्ये पाणी शिल्लक नाही. अशा अवस्थेत पिके जगविणे शेतकऱ्यांना कठीण होऊन बसले आहे. मागील वर्षातील पावसामुळे यंदाच्या रब्बी हंगामात सुमारे अडीच ते तीन टीएमसी पाण्याची बचत झालेली आहे. त्यामुळे धरणातील सध्याच्या पाणीसाठ्यातून गोदावरी कालव्याद्वारे दोन आवर्तने सहज देता येतील. मग पाटबंधारे विभाग पिके उद्ध्वस्त झाल्यावर आवर्तन सोडणार आहे का ? असा प्रश्न शेतकरीवर्गामधून विचारला जात आहे, असेही परजणे म्हणाले.