देवळाली प्रवरा/श्रीरामपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सत्तेवर येताच धडाकेबाज निर्णय घेण्यास सुरुवात केली मात्र त्याचा पहिला फटका देशातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना बसला. महाराष्ट्रातील विधानसभेच्या अगोदर केंद्र सरकारने कांदा निर्यातीबाबतचे धोरणात बदल केला नाही तर शेतकऱ्यांच्या नाराजीचा परिणाम मतपेटीतून दिसून येईल असा इशारा खा. राजू शेट्टी यांनी दिला.देवळाली प्रवरा येथे झालेल्या शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते. आम्ही महायुतीचा घटक पक्ष असलो तरी शेतकऱ्यांच्या विरोधातील निर्णयांना आमचा कायम विरोध असेल. कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी सरकारवरचा दबाव वाढवण्यिाची गरज त्यांनी व्यक्त केली. सदाभाऊ खोत म्हणाले की, निवडणूक काळात लोकांना १५ दिवस गुंगीत ठेवून पाच वर्षे मजा मारणारांना त्यांची जागा दाखवण्याची गरज आहे. मोदींना पाठींबा दिला म्हणजे ‘घरजावई’ झालो नाही, शेतकऱ्यांच्या विरोधात निर्णय घेतला तर त्यांनाही सोडणार नाही असा इशारा त्यांनी दिला.यावेळी जिल्हाध्यक्ष अंबादास कोरडे यांनी जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा शेट्टीकडे दिला मात्र त्यांनी कोरडे यांना जिल्हाध्यक्षपदावर राहण्याचे आदेश दिले. कांताभाऊ कदम, बाळासाहेब जाधव, बाबाकाका देशमुख, विठ्ठलराव शेळके, देठे आदींची भाषणे झाली. डॉ.सुधीर क्षीरसागर, बाबा कदम, रवींद्र मोरे, सचिन चौधरी, भगिरथ पवार आदींसह संघटनेचे कार्यकर्ते व शेतकरी उपस्थित होते.(प्रतिनिधी)
शेतकऱ्यांविरोधी निर्णय खपवून घेणार नाही
By admin | Published: August 08, 2014 11:38 PM