शिर्डी (जि. अहमदनगर) : मोदीला सरकारला हटविण्यासाठी ठराविक कार्यक्रम इंडीया आघाडीच्या माध्यमातून राबवावे लागणार आहेत. वाढती बेरोजगार, महागाई, आर्थिक विषमता, खासगीकरण असे मुद्दे घेऊन योग्य असे धोरण आम्ही ठरविणार आहोत. राष्ट्रवादीतील कार्यकर्त्यांना सांगणायचे आहे की, येत्या निवडणूकांमध्ये आपण सहकारी पक्षांना सोबत घेऊन सामाेरे जाणार आहोत. एकट्याने जाणार नाहीत.
महाराष्ट्रातील वेगवेगळ्या भागातील जी आव्हाणे आहेत, त्यातून असे दिसते जनमानसातून पर्याय दिला पाहिजे, नक्कीच त्यास जनतेचा पाठींबा मिळेल. त्या कामाला तुम्ही तयार रहा, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पदाधिकाऱ्यांना केले.राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन दिवसीय 'ज्योत निष्ठेची, लोकशाहीच्या संरक्षणाची' या शिबिरात शरद पवार बोलत होते. ते पुढे म्हणाले की, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारधारेला महत्त्व देण्याचे काम देशात सुरू आहे. हिंदूत्वावर आधारीत फॅसीझम त्यांना आणायचा आहे. त्यासाठी त्यांनी पाच कलमी कार्यक्रम हातात घेतला आहे. सर्वक्षेत्रात खासगीकरण, नफेखोरीला प्राेत्साहन, मुस्लिम समाजाविरूध्द द्वेश वाढवणे, स्वायत्त संस्थांवर कब्जा ठेवणे, मनुवादी वर्चस्ववाद वाढविणे, धर्माच्या नावाखाली पाकिस्तान विरोधी आक्रमकता दाखविणे अशा मुद्द्यातून भारतीय जनता पक्ष जनतेसमोर वेगळे वातावरण तयार करीत असल्याचेही ते म्हणाले.
यावेळी खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या की, सेवा, सन्मान व स्वाभिमान ही त्रिसुत्री घेऊन आपण जनतेसमोर जाणार आहोत. सत्ता आल्यानंतर शेतकऱ्यांना पुर्ण कर्जमाफी, अंगणवाडी सेवकांचे प्रश्न, महिला सुरक्षीतता, बचत गट, परिवहन महामंडळ व पोलीसांचे सक्षमीकरण, प्रत्येक तालुक्याला एमआयडीसी, प्रत्येक मुल शाळेत जाईल, पुर्ण क्षमतेने औषधोचारासह रूग्णसेवा होईल याची काळजी, पेन्शन योजना, शासकीय सेवेतील कॉन्ट्रॅक्ट भरतीचा फेरविचार हे प्रश्न प्राधान्याने मार्गी लावणार असल्याचे सुतोचास खासदार सुळे यांनी केले.
मराठा, धनगर, लिंगायत, मुस्लिम आदी आरक्षणाला पक्षाचा पाठिंबा असल्याचेही सुळे यांनी सांगितले. पन्नास खोके इज नॉट ओके, तेवढ्यात विकले जात असाल तर लाजिरवाणी गोष्ट असल्याची टिका त्यांनी केली. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आपल्या समारोपाच्या भाषणातुन निवडणुकीसाठी सज्ज राहण्याचे आवाहन करताना लवकरच महाविकास आघाडीचे लोकसभेसाठी जागा वाटप होईल असे स्पष्ट केले. आपल्याकडे महाविकास आघाडीचा कोणताही उमेदवार असला तरी त्याला पुर्ण ताकदीनिशी निवडून आणा तरच राज्याचे गणित सोपे होईल. निवडणुकांच्या तयारीला लागा, रामाच्या मुद्दयात अडकू नका, जनतेचे प्रश्न सोडवा, सरकारच्या उणीवा जनतेसमोर आणा असे आवाहन पाटील यांनी राज्यभरातील पदाधिकाऱ्यांना केले. गुरूवारी शिबिराच्या दुसऱ्या दिवशी अशोक वानखेडे, एकनाथ खडसे, संजय औटे, अनिल देशमुख, अमोल कोल्हे आदी वक्त्यांनी उपस्थीतांना मार्गदर्शन केले. गेले दोन दिवसांपासुन सुरू असलेल्या या शिबीराला राज्यभरातुन दोन हजारावर पदाधिकाऱ्यांची उपस्थीती होती.
वंचित बहुजन आघाडीला सोबत घेणार
वंचित बहुजन आघाडीशी आमची चर्चा सुरू आहे. प्रकाश आंबेडकर यांचेही मत आहे की, कोणत्याही परिस्थितीत मोदी सरकारला सत्तेतून हटविले पाहिजे. त्यासाठी संपुर्ण सहकार्य ते करणार आहेत, म्हणून इंडीया आघाडीतील इतर पक्षांशी मी बोलणार आहे, त्यांना सांगणार आहे की, प्रकाश आंबेडकर यांनाही आपण इंडीयामध्ये सामील करून घेऊ, असे शरद पवार यांनी स्पष्ट केले.