अहमदनगर: आरटीई प्रवेश प्रक्रियेला यंदा ग्रहण लागलेले दिसत आहे. एरव्ही एप्रिलपर्यंत उरकणारे प्रवेश यंदा शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे जुलै, ऑगस्टपर्यंत जातात की काय? अशी स्थिती निर्माण झाली आहे. दरम्यान केवळ इंग्रजीऐवजी १ किलोमीटरच्या कोणत्याही शाळेत प्रवेश घ्यावा लागणार हा शासनाने घेतलेला निर्णय न्यायालयाने रद्द केल्याने आता पूर्वीप्रमाणे इंग्रजी शाळांमध्ये प्रवेश होणार का? याकडे पालकांचे लक्ष लागले आहे.
आरटीई कायद्यांतर्गत खासगी शाळांतील २५ टक्के राखीव जागांवर दुर्बल आणि वंचित घटकांतील विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जात होता. या प्रवेशांसाठी राज्य सरकारकडून खासगी शाळांना शुल्क प्रतिपूर्ती केली जाते. मात्र फेब्रुवारीमध्ये राज्य सरकारच्या शालेय शिक्षण विभागाने आरटीई कायद्यात बदल करून विद्यार्थ्यांच्या निवासस्थानापासून एक किलोमीटरच्या परिसरातील शासकीय शाळा, स्थानिक स्वराज्य संस्था आणि खासगी अनुदानित शाळांमध्ये प्रवेश देण्याचा निर्णय घेतला. या शाळांचा पर्याय उपलब्ध नसेल तरच खासगी स्वयंअर्थसाहाय्यित शाळांमध्ये प्रवेश दिला जाईल, असे जाहीर केले.
या निर्णयामुळे एका अर्थाने खासगी स्वयंअर्थसाहाय्यित शाळा आरटीई प्रवेशातून वगळल्या जाणार होत्या. या बदलाला पालकांमधून विरोध करण्यात आला. तसेच या निर्णयाविरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली. सोमवारी उच्च न्यायालयाने शासनाच्या आरटीई कायद्यातील बदलाला स्थगिती दिली आहे. यावर पुढील सुनावणी १२ जूनला होणार आहे. तोपर्यंत शासनाकडून प्रवेशाबाबत काय धोरण घेतले जाते, याकडे पालकांचे लक्ष लागले आहे.--------------प्रवेश प्रक्रिया तात्पुरती थांबवली शासनाच्या वेबसाईटवर आरटीई प्रवेश प्रक्रिया सुरू होती. १० मे पर्यंत अर्ज करण्याची मुदत होती. मात्र न्यायालयाच्या निकालानंतर लगेच ही प्रक्रिया तात्पुरती थांबवण्यात आल्याचे संकेतस्थळावर जाहीर करण्यात आलेले आहे. पुढील प्रक्रियेबाबत अद्याप शासनाकडून कोणत्याही सूचना नसल्याने जिल्हास्तरावर अधिकाऱ्यांसह पालकांमध्येही संभ्रमावस्था आहे.---------------आतापर्यंत प्रतिसाद कमीदरवर्षी राज्यात सुमारे एक लाख जागांसाठी तीन ते साडेतीन लाख अर्ज येत होते. मात्र, या वर्षी केवळ शासकीय शाळा प्रवेशासाठी उपलब्ध करून दिल्याने पालकांनी आरटीई प्रवेशाकडे पाठ फिरवल्याचे पाहायला मिळाले. दरम्यान आता न्यायालयाने शासनाच्या अधिसूचनेला स्थगिती दिल्याने पालकांना इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये प्रवेशाच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.------------------नगर जिल्ह्यात ३ हजार अर्जराज्यात आतापर्यंत ७६ हजार ५३ शाळांमधील ८ लाख ८६ हजार ४११ राखीव जागांसाठी आतापर्यंत ६९ हजार ३६१ अर्ज दाखल झालेले आहेत. त्यात नगर जिल्ह्यात ४ हजार ५७ शाळांमधील ४८ हजार २२४ जागांसाठी ३ हजार ७३ अर्जांचा समावेश आहे.