केडगाव : जिल्हा सहकारी बँकेसाठी माजी आमदार शिवाजी कर्डिले सलग तिसऱ्यांदा रणांगणात उतरत आहेत. शुक्रवारी (दि.२२) ते सेवा सोसायटी मतदारसंघातून अर्ज दाखल करत आहेत. महाविकास आघाडीची अद्याप उमेदवार शोधमोहीम सुरू आहे. कर्डिले यांची बिनविरोध निवडून येण्याची हॅटट्रीक होणार का? याकडे लक्ष लागले आहे.
जिल्हा सहकारी बँकेसाठी अर्ज भरण्यास सुरूवात झाली आहे. सेवा सोसायटी मतदार संघातून शिवाजी कर्डिले तिसऱ्यांदा रणांगणात उतरत आहेत. यापूर्वी दोन वेळा त्यांच्या विरोधात महाविकास आघाडीला उमेदवार देता न आल्याने ते बिनविरोध संचालक झाले. यावेळीही त्यांनी जिल्हा बँकेची निवडणूक प्रथमपासूनच गांभिर्याने घेतल्याचे दिसून येत होते. जानेवारी २०२० मध्ये ज्यावेळी जिल्हा बँकेसाठी सेवा सोसायटी मतदार संघातून मतदारांचे ठराव केले जात होते. त्याचवेळी आपले ठराव जास्त कसे होतील याची मोर्चेबांधणी करीत त्यांनी यशस्वीपणे महाविकास आघाडीवर मात केली होती. १०९ पैकी ८० पेक्षा जास्त ठराव कर्डिले समर्थकांचे असल्याचा दावा केला जात आहे. महाविकास आघाडीही ४० ठराव आपले असल्याचे सांगत आहे.
----
हराळांचा ठरावच झाला नाही..
माजी जिल्हा परिषद सदस्य बाळासाहेब हराळ यांनी जिल्हा बँकेसाठी तयारी सुरू केली होती. त्यासाठी त्यांनी महाविकास आघाडीची बैठक घेत गावोगावच्या ठरावांसाठी मोर्चेबांधणी सुरू केली होती. मात्र बाळासाहेब हराळ यांच्या गुंडेगाव सेवा सोसायटीचे सदस्य ऐनवेळी फोडत कर्डिले यांनी हराळांचा ठरावच होवू दिला नाही. परिणामी महाविकास आघाडीचा संभाव्य उमेदवार रणांगणात उतरण्याआधीच बाद झाला. त्यामुळे महाविकास आघाडीला उमेदवार शोध सुरू केला आहे. जिल्हा सहकारी बँकेचे संचालक रावसाहेब शेळके आणि माजी संचालक संपतराव म्हस्के यांची नावे महाविकास आघाडीकडून सध्या चर्चेत आहेत.
----------
नगरला मिळाले तीनदा अध्यक्षपद
जिल्हा बँकेची स्थापना होऊन ६२ वर्षांचा काळ लोटला. या काळात किसनराव हराळ (१९८० ते ८१) दादा पाटील शेळके (१९९१ ते ९२) शिवाजी कर्डिले (२००९ ते १०) अशा प्रकारे तिघांना आतापर्यंत अध्यक्षपदाची संधी मिळाली आहे.