जवळा (जि. अहमदनगर) : जामखेड तालुक्यातील जवळा व नान्नज परिसरात सोमवारी सायंकाळी वादळी वारा, विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झाला. जवळा परिसराला वादळी वाऱ्याचा सर्वाधिक फटका बसला असून, घरांवरील पत्रे उडाले, तसेच वीज पडून एका वासराचा मृत्यू झाला. शेती पिकांचेही मोठे नुकसान झाले.
जवळा परिसरात सोमवारी सकाळपासूनच ढगाळ वातावरण हाेते. सायंकाळी ५ च्या सुमारास अचानक वादळी वाऱ्यासह पावसाला सुरुवात झाली. जाेरदार वादळी वाऱ्यामुळे जवळा येथील सीना नदीच्या परिसरातील रामकिसन रामचंद्र भोगे यांच्या घरावरील पत्रे वाऱ्यासाेबत उडून गेले. त्यामुळे संसाराेपयाेगी साहित्य पावसाच्या पाण्यात भिजले, तसेच हनुमंत सदाशिव वाळुंजकर यांच्या वासरावर वीज पडून त्याचा मृत्यू झाला. सोबतच शेतशिवारातील ज्वारी, कडब्यासह आंबा, चिकू, आदी पिकांचे माेठे नुकसान झाले आहे. तर आंब्यांचा मोहर, कैऱ्या वाऱ्याने गळून पडल्या.