भेंडा : २२० के. व्ही. विशविंड (पवनऊर्जा) ते भेंडा या अतिउच्चदाब वाहिनीचे मनोरे उभारणीच्या कामाबाबत हरकती व आक्षेप घेणाऱ्या शेतकऱ्यांची नगर उपविभागीय अधिकारी यांनी नुकतीच सुनावणी घेतली. ही सुनावणी अन्यायकारक व एकतर्फी असून वाढीव मोबदल्याच्या मागणीसाठी सौंदाळा (ता. नेवासा) परिसरातील शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे दाद मागितली आहे.
२२० के. व्ही. विशविंड (पवनऊर्जा) ते भेंडा या अति उच्चदाब वाहिनीची पायाभरणी, उभारणी व तारा ओढणीचे काही कि.मी. चे काम पूर्ण झालेले आहे. मात्र कौठा, रांजणगावदेवी व सौंदाळा येथील काही शेतकऱ्यांनी या वाहिनीच्या कामास आक्षेप घेऊन काम बंद केले. यावर नगर उपविभागीय अधिकारी तथा भूसंपादन अधिकारी यांच्यासमोर २६ नोव्हेंबरला झालेल्या सुनावणीवेळी या वाहिनीच्या कामासाठी गुंतणाऱ्या, वापरल्या जाणाऱ्या शेतजमिनीचा मोबदला अतिशय तुटपुंजा आहे. काम करताना शेतातील पिकांची नासाडी होते. यापूर्वी संबंधित शेतकऱ्यांच्या शेतातून इतरही वीज वाहिन्या गेल्याने नुकसान झालेले आहे. असे मुद्दे मांडूनही सुनावणीमध्ये याबाबत कोणताच विचार झाला नाही. त्यावेळी पर्याय, उपाययोजना व जबाबदारी असे काहीच निश्चित न केल्याने आमच्यावर अन्याय झाला झाला आहे, असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.
सुनावणीनंतर करावयाच्या अपिलीय अधिकाऱ्याचा पत्ता, संपर्क क्रमांक लेखी मागणी करूनही दिला नाही. तसेच सार्वजनिक हितार्थ प्रकल्प असल्याचे प्रांताधिकारी यांनी म्हटले आहे. तरी आमच्या वैयक्तिक हिताकडे दुर्लक्ष का? असा प्रश्न शिवाजी शिरसाठ (कौठा), संभाजी चौधरी (रांजणगाव देवी), बंडू ठुबे (सौंदाळा) यांच्यासह इतर शेतकऱ्यांनी केला आहे.