- अशोक निमोणकर
जामखेड (जि. अहमदनगर): तालुक्यासह परिसरात कालपासून वादळी वाऱ्यासह पाऊस सुरू आहे. आज दुपारी विजेच्या कडकडाटासह काही ठिकाणी पाऊस झाला. दुपारी दोन वाजता साकत परिसरातील पिंपळवाडी येथे पवनचक्कीवर वीज पडल्याने पवनचक्कीला आग लागली व मोठ्या प्रमाणात परिसरात धुर झाला. पवनचक्कीचे पाते खाली पडले. सुमारे अडीच ते तीन तास जाळ व धुर सुरू होता. सुदैवाने कसलीही जीवीत हानी झाली नाही.
काल सायंकाळपासून वादळी वाऱ्यासह काही भागात पावसाला सुरूवात झाली. आज दुपारी साकत पिंपळवाडी परिसरात वादळी वाऱ्यासह विजेचा गडगडाट सुरू झाला आणि दुपारी दोनच्या आसपास पिंपळवाडी परिसरात टेकाळे वस्ती जवळ शिवदास गंगाराम नेमाने यांच्या शेतात असलेल्या पवनचक्कीवर वीज कोसळली आणी पवनचक्कीने पेट घेतला. यावेळी जाळ आणी धुर मोठ्या प्रमाणावर झालेला होता. साकत पिंपळवाडी परिसरात काय पेटले असे लोकांना वाटले सुमारे अडीच ते तीन तास जाळ व धुर निघत होता.
सध्या ज्वारी पिकाची काढणी सुरू आहे. त्यामुळे लोक शेताततच होते अचानक पावसाला सुरूवात झाल्याने लोकांची धावपळ सुरू झाली. दुपारी दोनच्या आसपास शिवदास गंगाराम नेमाने यांच्या शेतातील पवनचक्कीवर वीज पडली आणी पवनचक्कीने पेट घेतला यामुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. सुमारे अडीच ते तीन तास धुर सुरूच होता. सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत धुर सुरूच होता. एक पाते जळून खाली पडले पवनचक्कीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.