संगमनेर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाने घातलेल्या निर्बंधांमुळे महाराष्ट्र राज्यमार्ग परिवहन महामंडळाच्या बसेसची चाके थांबली होती. निर्बंध शिथिल झाल्यानंतर बसेस पुन्हा रस्त्यांवर धावताना दिसत आहे. मात्र, काही बसेसच्या खिडक्यांच्या काचा निखळल्या आहेत. बसेसमधील सीटजवळ प्रवाशांना हात ठेवण्यासाठी असलेले हॅण्डरेस्ट तुटलेले आहे. त्यामुळे खराब बसेस दुरुस्त कराव्या, अशी मागणी प्रवाशांनी केली आहे.
पंढरपूरहून नाशिकला निघालेल्या बसमधील एका खिडकीच्या निखळलेल्या काचेतून पावसाचे पाणी आत येत असल्याने बसमधील प्रवासी भिजून गारठले होते. महाराष्ट्र राज्यमार्ग परिवहन महामंडळाची नाशिक आगाराची विठाई बस (एमएच १३ सीयू ८४१७) गुरुवारी (दि. १९) पंढरपूरहून नाशिकला निघाली होती. काही प्रवासी संगमनेरला येण्यासाठी कोल्हार बसस्थानकात थांबले होते. या बसस्थानकात पंढरपूर-नाशिक बस आल्यानंतर त्यात काही प्रवासी बसले. ही बस प्रवाशांनी भरली होती. वाहकाला बसण्यासाठी असलेल्या सीटच्या मागील बाजूस चार-पाच सीट सोडल्यानंतरच्या सीटवर कुणीही बसलेले नसून ते ओले होते. ओले झालेले सीट पुसून तेथे प्रवासी बसल्यानंतर खिडकीला काच नसल्याचे त्यांच्या लक्षात आले. तोपर्यंत बस स्थानकाबाहेर पडली होती. गुरुवारी दिवसभर पाऊस सुरू होता. त्यामुळे पावसाचे पाणी, गार वारा काच नसलेल्या खिडकीतून आत येत असल्याने बसधील काही प्रवासी भिजून थंडीने गारठले होते.
संगमनेर बसस्थानकात उभ्या असलेल्या संगमनेर आगाराच्या बसमधील (एमएच २० डी ९३९५) सीटजवळ असलेले अनेक ठिकाणचे हॅण्डरेस्ट तुटलेले आहेत. सर्वसामान्य प्रवाशांना परिवहन महामंडळाच्या बसेस हक्काच्या वाटतात. या बसमधून प्रवास करण्याशिवाय अनेकांना पर्याय नसतो. मात्र, बसेसच्या खिडक्यांच्या फुटलेल्या, निखळलेल्या काचेतून पावसाचे पाणी आत येते. सीटजवळचे हॅण्डरेस्ट तुटलेले असतात. त्यामुळे अशा बसमधून प्रवास करताना प्रवाशांची गैरसोय होते. अकोले आगाराची पुणे-अकोले बस (एमएच ०७ सी ९१३७) संगमनेर बसस्थानकात आली होती. या बसमधील शेवटच्या सीटच्या पुढे टायर ठेवलेले होते. हे टायर दोन्ही खिडक्यांना बांधल्याने खिडकी पूर्ण लावता येत नव्हती. टायर सीटवर ठेवल्याने सीटदेखील खराब झाले होते.
-----------------
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या लॉकडाऊन काळात बसेस जागेवर उभ्या असल्याने दुरुस्तीची कामे करता आली. अनेक छोटी-मोठी कामे करण्याला वेळ मिळाला. आता बसेस रस्त्यांवर धावत असून, काही किरकोळ कामे असू शकतील. बसमधून प्रवास करण्याला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळतो आहे.
नीलेश करंजकर, आगारप्रमुख, संगमनेर आगार
--
कुटुंबातील सदस्यांसोबत कोल्हार बसस्थानकातून नाशिक आगाराच्या नाशिक-पंढरपूर या बसमध्ये बसलो होतो. या बसमधील वाहकाला बसण्यासाठी असलेल्या सीटच्या मागील चार-पाच सीट सोडल्यानंतर असलेल्या सीटवर आम्ही बसलो होतो, आमच्या सोबत बाळ होते. खिडकीची काच निखळल्याने पावसाचे पाणी, गारा वारा आत येत होता. सर्वसामान्यांना महामंडळाच्या बसेस हक्काच्या वाटतात. नादुरुस्त बसेस दुरुस्त कराव्यात.
-विकास डमाळे, शिवसेना उपशहरप्रमुख, संगमनेर, कार्याध्यक्ष, एकलव्य आदिवासी बहुउद्देशीय सामाजिक संघटना
................1077...........