कोपरगाव (जि.अहमदनगर) : मराठा आरक्षणासाठी कोपरगाव येथे सोमवार (दि. ११) पासून सुरू केलेले उपोषण पाचव्या दिवशी शुक्रवारी रात्री पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील व जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांच्या मध्यस्थीने प.पु. रमेश गिरी महाराज महाराज यांच्या हस्ते मागे घेण्यात आले.मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी अॅड. योगेश खालकर, अनिल गायकवाड व विनय भगत यांनी सोमवारपासून कोपरगाव येथील छत्रपती शिवाजी महाराज स्मारकासमोर उपोषण सुरू केले होते. शुक्रवारी उपोषणाचा पाचवा दिवस होता. रात्री सव्वा नऊच्या सुमारास पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ, पोलीस अधीक्षक राकेश, आमदार आशुतोष काळे, माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांनी उपोषणकर्त्यांशी चर्चा केली. यावेळी पालकमंत्री विखे म्हणाले, मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी येथील तीन जणांनी उपोषण सुरू केले होते. राज्य शासन आरक्षणाच्या बाजूने आहे.
सर्वोच्च न्यायालयात आरक्षण टिकले पाहिजे यासाठी कायदेशीर बाजू अभ्यासपूर्णरित्या मांडण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांची न्यायालयात टिकणारे आरक्षण मिळावे अशी प्रामाणिक इच्छा आहे. त्यामुळे उपोषणकर्त्यांनी विनंती मान्य करावी व उपोषण मागे घ्यावे अशी विनंती विखे यांनी केली. तर जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी शासनाकडे उचित कारवाईसाठी आपल्या मागण्या पाठविण्यात आले असल्याचे सांगितले. आपण उपोषणापासून परावृत्त व्हावे अशी विनंती केली. त्यानंतर उपोषणकर्त्यांनी आपले उपोषण मागे घेतल्याचे जाहीर केले.यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप मिटके, तहसीलदार संदीप कुमार भोसले, पोलीस निरीक्षक प्रदीप देशमुख, आमदार आशुतोष काळे, नगराध्यक्ष विजय वहाडणे, माजी आमदार स्नेहलात कोल्हे, अॅड. शंतनू धोर्डे, राजेंद्र जाधव, विकास आढाव, दत्ता काळे, कैलास जाधव, संदीप देवकर, कृष्णा आढाव, मुकुंद इंगळे ,प्रशांत वाबळे, मनोज नरोडे, हिरालाला महानुभव, वीरेन बोरावके, मनोज कडू, बाळासाहेब रुईकर, मांडर पहाडे, बबलू वाणी, विनायक गायकवाड, केशव भवर, शैलेश साबळे, सचिन सावंत, अमित आढाव, जनार्धन कदम, सुनील देवकर, वैभव आढाव,वाल्मिक लहिरे आदी उपस्थित होते.