बुधवारी अकोले शासकीय विश्रामगृह येथे पत्रकार परिषद झाली. यावेळी आ. लहामटे यांच्यासह साथी दशरथ सावंत, बी.जे. देशमुख, सुरेश गडाख, विनय सावंत यांनी जिल्हा बँक निवडणुकीतून माघार घेण्याची भूमिका स्पष्ट केली.
काँग्रेसचे तालुकाध्यक्ष दादा पाटील वाकचौरे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष भानुदास तिकांडे आदी उपस्थित होते.
सहकारी संस्थांच्या निवडणुका या मॅटवरील कुस्ती असल्याने डाव-प्रतिडाव ठरले असतात. तालुक्यातील सहकारी संस्था पुन्हा ऊर्जितावस्थेत आणण्यासाठी अगस्ती साखर कारखाना, दूध संघ निवडणुकीत आघाडी सरकार तालुक्यातील सर्वपक्षीय समन्वय समितीच्या मागे भक्कमपणे उभे राहिले, असे अजित पवार यांनी आश्वासन दिले. म्हणजे तालुक्याच्या व्यापक हितासाठी हा निर्णय मंत्री पवार व महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या सूचनेनुसार घेतला गेल्याचे यावेळी सांगण्यात आले.
सावंत यांची समन्वय समितीकडून तर गडाख यांची राष्ट्रवादीकडून उमेदवारी अर्ज होता. या दोन्ही अर्ज माघारीमुळे जिल्हा बँकेचे अध्यक्ष सीताराम गायकर यांचा बिनविरोधचा मार्ग मोकळा झाला आहे.