लोकमत न्यूज नेटवर्कअहमदनगर : महावितरणने जिल्हाभरात तीन दिवस राबविलेल्या विशेष मोहिमेत एक कोटी ३० लाख रुपयांची वीजचोरी उघडकीस आली आहे. स्थानिक अभियंते, कर्मचारी आणि इतर जिल्ह्यातून आलेली भरारी पथके यांच्या संयुक्त विद्यमाने ही मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेत तपासणी करण्यात आलेल्या एकूण ११०२ ग्राहकांच्या मीटरपैकी ४८७ जणांकडे वीजचोरी आढळून आली असून संबंधितांविरुद्ध कारवाई सुरू आहे.पथकांनी जिल्ह्यातील अहमदनगर शहर, ग्रामीण, कर्जत, श्रीरामपूर व संगमनेर या पाचही विभागांमध्ये सलग तीन दिवस व्यापक तपासणी मोहीम राबवून वीजचोरी उघडकीस आणली. पथकाद्वारे ५११ घरगुती, ४८० व्यावसायिक व १११ औद्योगिक ग्राहकांच्या मीटरची तपासणी करण्यात आली. या तपासणीतून ४८७ ठिकाणी वीजचोरी होत असल्याचे समोर आले. त्यातील २२१ घरगुती, १२८ व्यावसायिक आणि ६ औद्योगिक अशा एकूण ३११ ग्राहकांविरुद्ध वीज कायदा २००३ चे कलम १३५ ते १३८ नुसार तर १७६ ग्राहकांवर कलम १२६ नुसार कारवाई सुरू आहे. स्थानिक अभियंते व कर्मचाºयांच्या पथकांने ८४३ ग्राहकांकडे तपासणी करून ३२२ ठिकाणची वीज चोरी उघडकीस आणली. भरारी पथकाने तपासणी केलेल्या २५९ ग्राहकांपैकी १६५ जणांकडे वीज चोरी आढळून आली. विशेष मोहिमेत तपासणी करण्यात आलेल्या एकूण ग्राहकांपैकी ४४ टक्क्यांपेक्षा अधिक ग्राहकांकडे वीजचोरी आढळून आली आहे.कलम १३५ ते १३८ नुसार ३११ जणांना ८१ लाख ६९ हजार रुपयांचे वीज चोरीचे बिल देण्यात आले असून २० लाख ४७ हजार रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे. त्यातील १२ जणांनी वीजचोरीचे ४ लाख ३१ हजार तसेच दंडाची ९१ हजार रुपयांची रक्कम भरली. तर ८ जणांविरुद्ध वीज चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कलम १२६ प्रमाणे कारवाई करण्यात आलेल्या १७६ जणांना ४८ लाख रुपयांच्या वीज चोरीचे बिल देण्यात आले असून १० जणांनी ३ लाख ६४ हजार रुपयांचा भरणा केला आहे. मुख्य अभियंता दीपक कुमठेकर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच सुरक्षा व अंमलबजावणी विभागाचे उपसंचालक सुमित कुमार आणि अधीक्षक अभियंता अनिल बोरसे यांच्या नेतृत्वाखाली ही मोहीम यशस्वी करण्यात आली.
- वीजचोरीला प्रतिबंध करण्यात सहकार्य करा
- महावितरणची राज्यातील सर्वाधिक थकबाकी अहमदनगर जिल्ह्यात आहे. जानेवारी- २०१८ अखेर जिल्यातील एकूण ९ लाख ७७ हजार ८४० वीज ग्राहकांपैकी ६ लाख २७ हजार १३७ ग्राहकांकडे २ हजार ६४० कोटी १० लाख रुपयांचे वीजबिल थकीत आहे. तर एप्रिल ते आॅक्टोबर २०१७ दरम्यान जिल्ह्यातील १५.५९ टक्के आणि वाणिज्यिक हानी ३९.६४ टक्के आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील वीज चोरीला पूर्णपणे प्रतिबंध कारणासाठी नागरिकांनी सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले आहे.