अकोले : निळवंडे धरणाच्या उच्चस्तरीय उजव्या कालव्याचे व्हॉल्व बसवण्याचे काम कोरोनाच्या सावटामुळे लांबले आहे. व्हॉल्वच्या वेल्डींगचे काम पूर्ण होताच २५ किंवा २६ मार्चला उच्चस्तरीय डाव्या कालव्यातून शेतीसाठी आवर्तन पाणी सोडण्यात येईल, अशी माहिती लघुपाटबंधारे विभागाकडून मिळाली आहे.
‘गर्दणी-बहिरवाडी-उंचखडक खर्द-टाळळी-ढोकरी-तांभोळ परिसरातील रब्बीची पिके धोक्यात आली आहेत. उच्चस्तरीय डाव्या कालव्यातून पाणी सोडले नाही तर धरणाचे गेट बंद आंदोलन छेडू असा इशारा शेतक-यांनी दिला’ ही बातमी ‘लोकमत’मध्ये मंगळवारी प्रकाशित होताच लघु पाटबंधारे विभागाने वरील निर्वाळा दिला आहे. आमदार डॉ.किरण लहामटे यांनी बातमीची दखल घेत व्हॉल्व बसविण्याच्या कामात दिरंगाई नको, अशा सूचना लघुपाटबंधारे विभागाला देत आपण आवर्तनाबाबत शेतक-यांच्या मागणी सोबत आहोत, असे स्पष्ट केले. पाण्याच्या आडून राजकारण खपवून घेतले जाणार नाही. निळवंडे उच्चस्तरीय डाव्या कालव्यातून पाणी सोडले जाणार असून याची सूचना १७ तारखेलाच दिली गेली होती. मात्र काही तांत्रिक अडचणीमुळे पाणी सोडणे शक्य झाले नाही. याची खात्री न करता काही राजकीय मंडळींनी याचे राजकारण सुरु केले ही खेदजनक बाब आहे. २५ मार्चला हे आवर्तन सोडले जाणार आहे. शेतकरी वर्गाला मनस्ताप सहन करावा लागणार नाही व पाण्याचा अपव्यय टाळून पुढे पाणी पिण्यासाठी आवर्तन राखून ठेवले जाणार आहे, असे लहामटे यांनी सांगितले. आढळा विभागातील शेतक-यांची मागणी लक्षात घेऊन २५ मार्चला पाडोशी धरणातून तर २६ मार्चला सांगवी धरणातून पाणी सोडले जाणार आहे. यामुळे केळीसांगवी, टाहाकारी, समशेरपूर, सावरगावपाट भागातील शेतीला दिलासा मिळणार आहे. मुळा खो-यात ‘आंबीत ते आभाळवाडी’ लाभक्षेत्रात पाणी सोडले गेले असून बलठण, कोथळा तलावांमधून स्थानिक शेतक-यांना पाणी दिले जाणार आहे, असेही त्यांनी सांगितले.
उच्चस्तरीय कालव्याच्या ‘उजवा-डावा’ शाखा एकाच ठिकाणाहून विभागल्या जातात. उजव्या कालव्याचे व्हॉल्व बसण्याचे काम सुरु आहे. कोरोनामुळे कामगारांना सक्ती करता येत नाही. मंगळवार-बुधवार व्हॉल्व चे काम पूर्ण होणे अपेक्षित असून काम पूर्ण होताच डाव्या कालव्यास पाणी सोडले जाईल. - हरुन तांबोळी, उपविभागीय अभियंता, लघुपाटबंधारे विभाग, निळवंडे.