राहुरी : अयोध्येतील श्रीराम मंदिर निर्माण निधी संकलन अभियानाच्या माध्यमातून भव्य मंदिर उभारणीचे आपण साक्षीदार बनत आहोत, असे भावोद्गार निधीसंकलन अभियानाचे राहुरी तालुका प्रमुख डॉ.रामकिसन ढोकणे यांनी काढले. राहुरी शहराच्या निधी समर्पण अभियानाच्या शुभारंभप्रसंगी राहुरीतील शनी-मारुती मंदिरात डॉ.ढोकणे बोलत होते. डॉ.ढोकणे पुढे म्हणाले, श्रीराम जन्मभूमी भारतीयांची अस्मिता व भावनेचा विषय होता. समस्त भारतीयांचे आदर्श श्रीरामचंद्र आहेत. रामजन्मभूमीबाबत प्रदीर्घ संघर्ष झालेला आहे. त्यामुळे आता भारतीयांच्या मनात आपल्याला पुन्हा राम जागृत करायचा आहे. भव्य मंदिर उभारणीबरोबरच आपल्याला समाजाचीही उभारणी करावयाची आहे. राहुरी शहरवासीयांनी व समस्त रामभक्तांनी या अभियानात आपला खारीचा वाटा उचलावा, असे आवाहन डॉ.ढोकणे यांनी केले.
यावेळी मंदिरामध्ये प्रारंभी समाजातील विविध जोडप्यांनी श्रीराम, भारतमाता व निधीसंकलन पुस्तिकांचे विधीवत पूजन केले. श्रीराम नामाचाही यावेळी उद्घोष करण्यात आला. येत्या ३१ जानेवारीपर्यंत रामभक्त आपल्या घरापर्यंत येतील राममंदिरासाठी निधी संकलन करतील. त्यासाठी सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले. विश्व शिवशाहीर विजय महाराज तनपुरे यांनी यावेळी प्रभू रामचंद्रांची महती सांगत हा विषय विशद केला. त्यांनी या अभियानात सर्वांनी सक्रिय सहभागी होण्याचे आवाहन केले. सखाराम महाराज भिसे यांनी आशीर्वादपर संबोधन केले. अभियान कार्यकर्ता सूरज राजेंद्र शिंदे यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी मोठ्या संख्येने रामभक्त नागरिक व महिला उपस्थित होते.