विसापूर : श्रीगोंदा तालुक्यातील विसापूर जलाशयाचे हद्दीतील पाटबंधारे विभागाच्या जमिनीतील व बांधावरील चंदनाच्या झाडांसह वृक्षतोड करण्यात आली. या वृक्षतोडीला विरोध केल्याने एका महिलेस मारहाण केल्याचा प्रकार घडला. याबाबत महिलेने बेलवंडी पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दिला आहे. त्यावरून पोलिसांनी तपास सुरू केला आहे.
विसापूर धरणाच्या लगत सुवर्णा शिंदे यांचे पती मधुकर कारभारी शिंदे यांच्या नावावर शेतजमीन आहे. त्यांच्या शेजारी सुमन भाऊसाहेब नानेकर, बाळू भाऊसाहेब नानेकर, सतीश भाऊसाहेब नानेकर व प्रकाश भाऊसाहेब नानेकर यांची जमीन आहे. नानेकर यांनी विसापूर धरणाच्या जमिनीसह शिंदे यांच्या जमिनीतही अतिक्रमण केले आहे, असा शिंदे यांचा आक्षेप आहे. नानेकर यांनी पाटबंधारे विभागाच्या हद्दीतील व शिंदे यांच्या बांधावरील चंदनाच्या झाडांसह बाभूळ, बोर, चिंच, कडूनिंब व कवठ आदी वृक्षांची बेकायदा तोड केली. पाटबंधारे विभागाच्या हद्दीतील रस्ताही त्यांनी बंद केला. शिंदे यांनी जमीन स्वस्त भावात नानेकर यांना विकून टाकावी यासाठी ते त्रास देत आहेत. तुम्हाला तुमची जमीन आम्हालाच विकावी लागेल. तुम्ही तुमची जमीन कशी वहीत करता ते आम्ही पहातोच, अशा सतत धमक्या नानेकर देतात, असे शिंदे यांनी तक्रार अर्जात म्हटले आहे.
सुवर्णा शिंदे या वृक्षतोडीबाबत विचारणा करायला गेल्या असता त्यांना सुमन नानेकर, बाळू नानेकर, सतीश नानेकर, प्रकाश नानेकर, सिंधू नानेकर, किरण नानेकर, सुरेखा नानेकर, विशाल नानेकर, निर्मला ढवळे, देवीदास ढवळे व इतर पाच जणांनी शिवीगाळ करत मारहाण केली व जीवे मारण्याची धमकी दिली असे बेलवंडी पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे.
बेकायदा वृक्षतोडीबाबत सुवर्णा शिंदे यांनी प्रादेशिक वन विभाग व पाटबंधारे विभागाकडे तक्रार केली. मात्र कोणत्याही विभागाकडून अद्याप कारवाई झाली नाही.
--
विसापूर येथे पाटबंधारे विभागाचे हद्दीतील व बांधावरील वृक्षांची तोड करून शेजाऱ्यांकडून सतत होणाऱ्या त्रासाबाबत सुवर्णा शिंदे यांचा तक्रार अर्ज बेलवंडी पोलीस ठाण्यात प्राप्त झाला आहे. दोन दिवसात चौकशी करून संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
-बजरंग गवळी,
सहाय्यक फौजदार, विसापूर पोलीस दूरक्षेत्र.
---
विसापूर येथील सुवर्णा शिंदे यांच्या तक्रारीवरून वृक्षतोड झालेल्या ठिकाणाची समक्ष पाहणी केली. त्या ठिकाणी वृक्षतोड झाल्याचे आढळून आले. मात्र वृक्षतोड झालेल्या ठिकाणाचा पंचनामा करण्यासाठी कोणताही ग्रामस्थ सहकार्य करत नसल्याने सध्या दोन्ही बाजूचे जबाब नोंदवून घेतले आहेत. शिंदे यांच्या तक्रार व जबाबानुसार नानेकर यांनी वृक्षतोड केल्याचे सांगितले. नानेकर यांचा जबाब नोंदवून घेतला असता शिंदे यांनीच वृक्षतोड केल्याचे त्यांच्याकडून सांगण्यात आले. वरिष्ठ कार्यालयात अहवाल सादर करून पुढील कार्यवाही करण्यात येईल.
-मच्छिंद्र गुंजाळ,
वनपाल, प्रादेशिक वनविभाग, श्रीगोंदा