कोपरगाव : तालुक्यातील सवंत्सरमधील मनईवस्ती येथील एका २२ वर्षीय विवाहित महिलेचा ग्रामीण रुग्णालयात शुक्रवारी (दि.२२ मे) मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सदर महिला सारी संशयित असल्याने मयत महिलेच्या घशातील स्त्राव नगर येथे तपासणीसाठी पाठवले असल्याची माहिती ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. कृष्णा फुलसौंदर यांनी दिली आहे. सदर महिलेला शुक्रवारी सकाळी १० वाजेदरम्यान कोपरगाव ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी आणले होते. तिच्यावर उपचार सुरु असताना अवघ्या २० मिनिटांत महिलेचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. या अगोदरही सारीच्या आजाराने तालुक्यातील शिंगणापूर येथील एका महिलेचा मृत्यू झाला होता. दरम्यान सदर महिलेच्या मृत्यूदेहावर कोपरगाव अमरधाम येथे प्रशासनाच्या निगराणीखाली शासकीय नियमावलीत अंत्यसंस्कार करण्यात आले. सदर महिला ज्या भागात राहत होती. तो भाग प्रशासनाच्या वतीने सील करण्याचे काम सुरु आहे. महिलेच्या मृत्युनंतर निर्जंतुकीकरण करण्यासाठी तत्काळ ग्रामिण रुग्णालयातील ओपीडी बंद केली. सदर ओपीडी नगरपालिकेच्या रुग्णालयात सुरू करण्यात आली आहे. मयत महिलेस टीबीचा त्रास असल्याचेही डॉ.फुलसौंदर यांनी सांगितले.
कोपरगावात सारी सदृश्य आजाराने महिलेचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2020 3:39 PM