सोमवारी (दि. २०) सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास सौताडा धबधब्याच्या पाण्यात एका महिलेचे प्रेत पर्यटकांना दिसून आले. सौताडा गावातील युवकांच्या मदतीने हे प्रेत पाण्यातून बाहेर काढले. धबधब्याजवळ एक पर्स, मोबाईल अशा वस्तू सापडल्या. त्यावरुन या महिलेची ओळख पटविण्यात आली असून, मृत महिलेचे नाव रोहिणी सोमेश्वर कुलकर्णी (वय ५३, रा. केडगाव, ताराबाग कॉलनी) असे आहे. संबंधित महिलेच्या मोबाईलवरुन तिच्या नातेवाईकांना याबाबत कळविण्यात आले. दोन महिन्यापूर्वी या महिलेच्या विवाहित मुलीचे अपघाती निधन झाले होते. मुलीच्या मृत्यूच्या वियोगात रोहिणी होत्या. याच वैफल्यातून त्यांनी आत्महत्या केली असावी, असा जबाब महिलेचा मुलगा व नातेवाईकांनी पाटोदा पोलिसांना दिला आहे.
हा मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यासाठी सौताडा गावातील विशाल मस्के, संदीप गायकवाड, राहुल मस्के, नितीन शिंदे, अशोक सानप, प्रशांत घुले, आकाश मस्के, बाबा उबाळे यांनी सहकार्य केले. पाटोदा ग्रामीण रुग्णालयात डॉ. सदाशिव राऊत यांनी शवविच्छेदन केले. पाटोदा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मनिष पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली बीट अंमलदार सुनील सोनवणे, अशोक तांबे हे पुढील तपास करत आहेत.