संगमनेर तालुक्यातील साकूर परिसरात शनिवारी सायंकाळी अचानक ढगाळ वातावरण व विजेच्या कडकडाटासह पाऊस सुरू झाला. साकूर येथून काही अंतरावर हिवरगाव पठार येथे राहत असलेल्या अनिता ऊर्फ मुक्ताबाई वणवे घरापासून काही अंतरावर शेतात शेळ्या चारण्यासाठी घेऊन गेल्या होत्या. पाऊस सुरू होण्याआधी अचानक विजेचा कडकडाट झाला. याचवेळी अंगावर वीज पडून त्यांचा जागीच मृत्यू झाला. काही वेळाने पाऊस सुरू झाला.
प्रांताधिकारी शशिकांत मंगरुळे, गटविकास अधिकारी सुरेश शिंदे, पोलीस निरीक्षक सुनील पाटील, पोलीस हेडकॉन्स्टेबल कैलास देशमुख, आदिनाथ गांधले, किशोर लाड, गणेश तळपाडे, युवासेना उपतालुका प्रमुख जनार्दन नागरे, सरपंच सुप्रिया मिसाळ, उपसरपंच दत्तात्रय वणवे, ग्रामसेवक विजय आहेर यांनी घटनास्थळी भेट दिली. घारगाव पोलिसांनी पंचनामा केला असून, पोलीसपाटील गौतम मिसाळ यांनी दिलेल्या खबरीवरून घारगाव पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल सुरेश टकले हे करत आहे.