केडगाव : नगर तालुक्यातील इमामपूर येथे सोमवारी शेतातील विहिरीत महिलेचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. त्या महिलेने आत्महत्या केल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे.
इमामपूर येथील बहिरोबा मळा परिसरात राहणारे बाळासाहेब पांडुरंग टिमकरे (गट नं. ७९) यांच्या विहिरीमध्ये सोमवारी सकाळी अज्ञात महिलेचा मृतदेह आढळून आला होता. या घटनेची माहिती सरपंच भिमराज मोकाटे यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यास दिली. पोलिसांनी स्थानिकांच्या मदतीने मृतदेह विहिरीतून बाहेर काढला. दरम्यान, एमआयडीसी पोलिसांनी नगर शहरातील पोलीस ठाण्यातील बेपत्ता तक्रारींची माहिती घेतली तेव्हा तोफखाना पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या बेपत्तामधीलच ती महिला असल्याचे स्पष्ट झाले आहे. वंदना दत्तात्रय बोरुडे-रेपाळे (रा. पाईपलाईन रोड नगर )असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव असून तिच्या पर्समध्ये सुसाइड नोट सापडली आहे. मणक्याच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या करत असल्याचे सुसाईड नोटमध्ये म्हटले आहे.