अकोले तालुक्यातील सुगाव खुर्द शिवारात भावकीत दोन गटांत तुफान हाणामारी झाली. वैद्य कुटुंबांमध्ये भावकीत शेतबांधावरून वाद आहेत. शुक्रवारी (दि. २) दोन कुटुंबांत तुफान हाणामारी झाली.
अंजली सुभाष वैद्य (वय ३९) यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मारुती परशुराम वैद्य, शांताराम परशुराम वैद्य, सुरेखा मारुती वैद्य, वेदांत मारुती वैद्य, मनीषा शांताराम वैद्य, मंदाबाई परशुराम वैद्य, सिद्धांत मारुती वैद्य यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अंजली वैद्य या कुटुंबीयांसह सुगाव खुर्द येथे राहतात. तेथे ते शेती व्यवसाय करतात. त्यांच्या शेजारी मारुती परशुराम वैद्य राहतात. त्यांच्याशी शेतीच्या बांधावरून वाद आहेत. शुक्रवारी मारुती वैद्य जेसीबीच्या साहाय्याने अंजली वैद्य यांच्या शेताकडे माती लोटत होते. यावेळी अंजली यांनी आमच्या शेताकडे माती लोटू नका, असे त्यांना सांगितले. यावेळी मारुती वैद्य यांच्यासह इतरांना गज, लाकडी काठ्यांनी अंजली यांच्यासह कुटुंबीयांना बेदम मारहाण केली. तसेच शिवीगाळही केली.
दुसरी फिर्याद सुरेखा मारुती वैद्य (३६) यांनी दाखल केली. त्यांच्या फिर्यादीवरून संभाजी किसन वैद्य, अंजली संभाजी वैद्य, भगवंता किसन वैद्य, अलका भगवंता वैद्य, संतोष बाबासाहेब वैद्य, बाबासाहेब किसन वैद्य यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. संभाजी वैद्य यांच्या कुटुंबीयांनी लोखंडी पहारीने मारहाण केली. त्यांनी शिवीगाळ करीत मारहाण केली. आरडाओरडा ऐकून सुरेखा वैद्य यांचे पती तेथे आले. त्यांनादेखील मारहाण करीत जिवे मारण्याची धमकी दिली, असे फिर्यादीत म्हटले आहे.
..................
या प्रकरणी महिला व कर्करोगाचा एक रुग्ण वगळता इतर पुरुष आरोपींना अटक करण्यात आली. काहींना अटक करणे बाकी आहे. लवकरच त्यांनाही अटक करण्यात येईल.
- अभय परमार, पोलीस निरीक्षक