केडगाव : रस्त्याच्या कडेला रिक्षाची वाट पाहत थांबलेल्या वृद्धेस लिंक रोडकडून नगरकडे येणा-या मालट्रकने चिरडले. या अपघातात वृद्ध महिलेचा जागीच मृत्यू झाला. ही घटना शुकवारी (दि.१०) दुपारी साडेबारा वाजण्याच्या दरम्यान नगर-पुणे रोडवरील केडगावमधील भूषणनगर चौकात हॉटेल रंगोली समोर घडली. शांताबाई ताराचंद काळे (वय ६५, रा.निमगाव वाघा, ता.नगर) असे या मयत झालेल्या वृध्देचे नाव आहे. काळे या नगरकडे जाण्याकरीता भूषणनगर चौकात रंगोली हॉटेल जवळील रस्त्याच्या कडेला रिक्षाची वाट पाहत उभ्या होत्या. त्यावेळेस लिंक रोडने नगरकडे भरधाव वेगात येणाºया मालट्रक (क्र.एम.एच.१६, ए.ई.-५७९७ ) चा धक्का लागून शांताबाई काळे या मागच्या चाकाखाली आल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. तर त्यांच्या शेजारी असलेली आणखी एक महिला सुदैवाने बचावली असून गंभीर जखमी झाली आहे. अपघात होताच घटनास्थळावरील नागरिक मदतीकरीता धावले. नागरिकांनी ट्रक चालक सय्यद (पूर्ण नाव माहित नाही, रा.बीड) याला पकडून कोतवाली पोलिसांच्या ताब्यात दिले. संतप्त नागरिकांनी यावेळी ट्रकच्या काचा फोडल्या. या घटनेची माहिती मिळताच नगरसेवक विजय पठारे, शिवसेनेचे शहरप्रमुख दिलीप सातपुते यांच्यासह रमेश परतानी, राजू पठारे, राजू सातपुते, भरत गारुडकर हे घटनास्थळी पोहोचले. या घटनेची माहिती कोतवाली पोलीस ठाण्यास देण्यात आली. अपघात होताच पुणे महामार्गावर दुतर्फा वाहतूक ठप्प झाली. संतप्त नागरिकांनी दिवसा शहरातून येणाºया अवजड वाहनांच्या विरोधात रास्ता रोको आंदोलन केले. दिवसा शहरातून अवजड वाहने जाण्यास बंदी असताना अवजड वाहने शहरात प्रवेश करतातच कशी? असा प्रश्न उपस्थित करुन केडगाव बायपास चौकात तसेच कल्याण बायपास चौक व भूषणनगर चौक येथे कायमस्वरुपी पोलीस कर्मचारी नेमावेत, अशी मागणी यावेळी आंदोलकांनी केली. शहर वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलीस घटनास्थळी पोहोचल्यानंतर त्यांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्याकरिता प्रयत्न केले. यानंतर रस्त्यावरील वाहतूक सुरळीत झाली.
केडगावला ट्रक धडकेने महिला ठार, संतप्त नागरिकांचा रास्तारोको
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2020 5:05 PM