अहमदनगर : राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांच्यासमोर महिलांनी मंगळवारी विविध तक्रारींचा पाढा वाचला. चाकणकर यांनी अधिकाऱ्यांना या महिलांच्या तक्रारीचे तात्काळ निवारण करण्याचे आदेश दिले. तर काही तक्रारींवर आयोग सुनावणी घेईल, असे म्हटले आहे.
महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी मंगळवारी (दि. २८) नगरमध्ये महिलांच्या विविध प्रश्नावर जनसुनावणी घेतली. यावेळी जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ, पोलीस अधीक्षक राकेश ओला, जिल्हा परिषदेचे सीईओ आशिष येरेकर, महापालिकेचे आयुक्त पंकज जावळे आदी उपस्थित होते. या जनसुनावणीसाठी जिल्हाभरातुन महिलांनी उपस्थिती लावली होती. प्रारंभी चाकणकर यांच्या हस्ते जनसुनावणी कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. त्यानंतर चाकणकर यांनी एकेका महिलेला समोर बोलावून थेट संवाद साधत समस्या जाणून घेतल्या. प्रत्येक महिलेने केलेल्या तक्रारींची सोडवणूक करून आपल्याला अहवाल सादर करण्याचे आदेश चाकणकर यांनी विविध विभागांच्या अधिकाऱ्यांना दिले.