शरद कासार वाळकी (जि. अहमदनगर) : भोरवाडी (ता. नगर) येथील एका ७६ वर्षीय आजीबाईंनी तीन वर्षांपूर्वी लाॅकडाउन काळात लावलेल्या सीताफळ झाडांना बहर आला आहे. १३० चिंच, ३६० सीताफळांची झाडे त्यांनी लावली असून त्यांचे संवर्धनही केले आहे. मनकर्णा भिवसेन जाधव असे तीन एकरावर नंदनवन फुलविणाऱ्या आजीबाईंचे नाव आहे. आजीबाईंनी ३ एकर क्षेत्रात जुलै २०२० मध्ये लॉकडाउन काळात १३० चिंच, ३६० सीताफळांची लागवड केली. या झाडांची काळजी घेतली. सीताफळाच्या झाडांना अडीच वर्षांतच बहर आला आहे. या अगोदर त्यांनी पडिक क्षेत्रात १२ चिंचेची व ४ आंब्याची झाडे लावली. १० वर्षांपासून त्याला फळे येतात.
ऑक्टोबर १९९० मध्ये हृदयविकाराने पतीचे निधन झाल्यानंतर मनकर्णा यांच्यावर कुटुंबाची जबाबदारी पडली. त्यांनी कष्ट करून दोन्ही मुलांना उच्चशिक्षित केले. मोठा मुलगा आबासाहेब माध्यमिक शिक्षक, छोटा मुलगा बबन नवी मुंबईला प्राध्यापक आहे.
जेथे शक्य होईल तेथे शेतकऱ्याने झाडे लावली पाहिजेत. त्यामुळे आपल्याला कमी कष्टात उत्पन्न मिळेल. म्हातारपणी एक आधार मिळेल. कमी खर्च व श्रमातून दीर्घकाळ उत्पन्न मिळविण्यासाठी कोरडवाहू फळझाडे लावणे फायदेशीर आहे. मनकर्णा जाधव, वृक्षप्रेमी, भोरवाडी, ता. नगर