महिला दिन विशेष
केडगाव : अर्णवचे वय पाच वर्षे तर विश्वजाचे वय अवघे तीन वर्षे अशा बालवयातच नियतीच्या मनात काय होते अन् काय नाही. कोरोनामुळे वडिलांचे निधन झाले. या कुटुंबावर दुःखाचा डोंगरच कोसळला. तरुणपणीच पतीचे निधन झाल्याने जगावे की मरावे? असा यक्ष प्रश्न समोर असताना आईचे ममत्व जागे झाले आणि येथून पुढे सुरू झाली जीवन जगण्यासाठी खरी धडपड.
ही संघर्षाची कहाणी आहे नगर तालुक्यातील जेऊर गावच्या विशाल पवार या तरुणाच्या कुटुंबाची. विशाल हा खूप कष्टाळू असा तरुण होता. जेऊर परिसरात मोबाईलचे दुकान चालवत कुटुंबीयांची उपजीविका भागवत होता. रात्रंदिवस कष्ट करून कुटुंब, चिमुरड्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी अपार मेहनत करत होता. कष्ट करून व्यवसाय व सुखी संसाराची स्वप्नं पाहणाऱ्या या तरुणाचा वयाच्या अवघ्या तिसाव्या वर्षी कोरोनाने दुसऱ्या लाटेत बळी घेतला.
पत्नी शुभांगी समोर तर यक्ष प्रश्न पडला होता. घरी शेती नाही, मुले लहान, तरुणपणातच पती गमावल्याचे दुःख वेगळेच. अशा अनेक समस्या समोर. दुःखात आपले कोण परके कोण याचा प्रत्यय क्षणोक्षणी येत राहिला. यातून सावरत चिमुरड्यांच्या भविष्यासाठी वाट्टेल ते करायचे पण जगायचे या निश्चयाने शुभांगी पवार यांनी माहेर असलेले फलटण गाव गाठले. तेथे नेट कॅफेमध्ये नोकरी करण्यास सुरुवात केली. आई-वडिलांची परिस्थिती हलाखीची. त्यामुळे स्वतः कष्ट करत मुलांचे संगोपन करण्याचे ध्येय डोळ्यासमोर ठेवून शुभांगी हिने नोकरी करण्याचा निर्णय घेतला. दिवसभर नोकरी करून मुलांच्या भविष्यासाठी जगण्याची धडपड सुरू केली आहे.
कोरोनामुळे आई-वडिलांचे छत्र हरपलेल्या चिमुरड्यांच्या भविष्याचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. अशा कुटुंबीयांना स्वयंसेवी संस्था, दानशूर व्यक्ती व प्रशासनाच्या वतीने आर्थिक मदतीची अत्यंत गरज आहे.
-बंडू पवार,
माजी उपसरपंच
----
गावाने दिला जगण्याचा आधार
विशाल पवार या तरुणाच्या निधनानंतर जेऊर गावातील संपूर्ण ग्रामस्थांच्या डोळ्यात अश्रू तरळले होते. प्रेमळ, कष्टाळू अशा या तरुणाचे निधन झाल्याने संपूर्ण गावावर शोककळा पसरली होती. अशावेळी मुंजोबा बहुउद्देशीय प्रतिष्ठानच्या वतीने काही तरुणांनी आर्थिक मदत गोळा करून या कुटुंबीयांना आधार देण्याचा प्रयत्न केला होता.