लोकमत न्यूज नेटवर्क
संगमनेर : म्हाळुंगी नदीवर बांधलेल्या संगमनेर शहर परिसरातील अकोले नाक्यावरील पुलाच्या सुशोभीकरणाचे काम सुरू आहे. हे काम सुरू असताना संगमनेर - अकोले रस्त्यावर अनेक ठिकाणी लांबच लांब खड्डे पडले आहेत. गेल्या काही महिन्यांपूर्वी सुरू झालेल्या या रस्त्याच्या रुंदीकरणासह दुरुस्तीचे कामही रेंगाळले आहे.
भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे सार्वजनिक बांधकाम विभागाचे मंत्री असताना त्यांनी ३ मार्च २०१९ संगमनेरात घाटघर-संगमनेर या महत्त्वपूर्ण रस्त्यासह बारी-राजूर-कोतुळ व रंधा-भंडारदरा-वारंघुशी या ८४ किलोमीटर लांबीच्या १६८ कोटी रुपये खर्च करून बांधण्यात येणाऱ्या रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन केले होते. ‘हायब्रीड ॲन्युटी’ तत्त्वावर हे काम करण्यात येत होते. मात्र, अडीच वर्ष पूर्ण होऊनदेखील संगमनेर-अकोले रस्त्याचे काम अद्यापही अपूर्ण आहे.
म्हाळुंगी नदीवर अकोले नाका येथे अनेक वर्षांपूर्वी बांधलेला जुना पूल आहे. संगमनेर - अकोले या शहरांना जोडणारा मुख्य रस्ता येथूनच जातो. नाशिक -पुणे बाह्यवळण महामार्गाचे काम पूर्ण झाल्यानंतर अकोलेकडे जाण्यासाठी पर्यायी मार्ग उपलब्ध झाला. असे असले तरीही अकोले नाका येथूनच वाहने मोठ्या संख्येने अकोलेकडे जातात. येथील पुलाची उंची कमी असून, म्हाळुंगीला पावसाळ्यात पूर आल्यास पुलावरून पाणी वाहिल्याने रस्ता बंद होतो. या पुलाचे दुभाजक तुटून बांधकामाचे लोखंडी गज बाहेर आले होते. याबाबत ‘लोकमत’मध्ये वृत्त प्रकाशित झाल्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाने दुभाजकाची दुरुस्ती करून घेतली.
सध्या पुलाच्या सुशोभीकरणाचे काम सुरू आहे. मात्र, पुलावर तसेच संगमनेर-अकोले रस्त्यावर अनेक ठिकाणी लांबच लांब खड्डे पडले आहेत. काही महिन्यांपूर्वी रस्ता रुंदीकरणासह दुरुस्तीचे काम सुरू झाले होते. रुंदीकरणासाठी रस्त्याच्या दुतर्फा साइडपट्ट्या खोदण्यात आल्या होत्या. काही ठिकाणी या साइडपट्ट्या भरल्या गेल्या नाहीत. तेथे मुरूम, खडी तशीच पडून आहे. डांबरीकरण न झाल्याने खडी उघडी पडली आहे. त्यामुळे अपघात घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. १६८ कोटी रुपये खर्च करून बांधण्यात येणाऱ्या रस्त्यांपैकी घाटघर-संगमनेर हा महत्त्वपूर्ण रस्ता आहे. संगमनेर-अकोले रस्त्याची अवस्था बिकट असल्याने प्रवाशांनी संताप व्यक्त केला आहे. केवळ रस्त्याला पडलेले खड्डे न बुजवता सर्वच अपूर्ण कामे तात्काळ सुरू करावीत, अशी मागणी संगमनेर, अकोले तालुक्यातील नागरिकांनी केली आहे.
---
दोन दिवस पाऊस आला नाही तर पूर्ण रस्ता कोरडा होऊन जाईल. त्यानंतर दोन-तीन दिवसांत खड्डे भरायची सोय होऊन जाईल.
-आर.आर. पाटील, कार्यकारी अभियंता. सार्वजनिक बांधकाम विभाग, संगमनेर
------------------
महिन्यात दहा-पंधरा दिवस अकोले-संगमनेर रस्त्यावरूनच प्रवास करावा लागतो. पडलेल्या खड्ड्यांमुळे वाहनांचेही नुकसान होते. या रस्त्याने प्रवास केला तर नवीन माणूस आजारी पडतो.
शिवाजी तुकाराम देशमुख, कोतूळ, ता. अकोले