विसापूर : श्रीगोंदा तालुक्यातील चांभुर्डी ते धाडगेवाडी (ता. पारनेर) रस्त्याचे काम रखडल्याने शेतकऱ्यांसह ग्रामस्थांना कसरत करावी लागत आहे.
हा २.९०० किमीचा रस्ता मुख्यमंत्री ग्रामसडक २०१७-१८ योजनेतून मंजूर झाला. या कामाची निविदा नगर येथील व्ही. व्ही. तवले या ठेकेदाराला मिळाले. ठेकेदाराने २०१९ मध्ये प्रत्यक्ष कामाला सुरुवात केली. कार्यारंभ आदेशानुसार हे काम १२ जून २०२० पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित होते. परंतु, अद्यापपर्यंत रस्ता पूर्ण झालेला नाही. या रस्त्याचे काम अर्धवट अवस्थेत असल्यामुळे सगळी खडी उघडी पडली आहे.
चांभुर्डीचे विद्यार्थी पारनेरला मोटारसायकलवरून कॉलेजमध्ये जाताना अनेक वेेळा खडीवर आलेल्या रस्त्यावरून घसरून पडून जखमी झाल्याचे प्रकार घडले आहेत. प्रवाशांना वाहतुकीस कसरत करावी लागते. बऱ्याच वेळा गाड्या खडीवरून घसरल्यामुळे दुचाकीस्वारांना दुखापतही झाली व गाडीचेही नुकसान झाले आहे.