ठेकेदारावर कारवाई करण्याची मागणी
केडगाव : नगर तालुक्यातील जेऊर प्राथमिक आरोग्य केंद्र नूतनीकरणाचे काम अत्यंत संथगतीने सुरू असून ग्रामस्थांसह आरोग्य कर्मचाऱ्यांना हकनाक त्रास सहन करावा लागत आहे.
आरोग्य केंद्राची जुनी इमारत जमीनदोस्त करण्यात आल्याने आरोग्य कर्मचाऱ्यांचे ही हाल होत आहेत कोरोना तपासणी, बाह्यरुग्ण विभाग, प्रसूती तसेच लहान बाळांचे लसीकरण यासाठी विविध अडचणी येत आहेत. तरी नूतनीकरणाचे काम तत्काळ पूर्ण करण्याची मागणी गोविंद मोकाटे यांनी केली आहे. माजी पंचायत समिती सदस्य गोविंद मोकाटे या विरोधात आक्रमक झाले असून संबंधित ठेकेदारावर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.
..............
आरोग्य केंद्राची जुनी इमारत जमीनदोस्त करण्यात आली आहे. त्यामुळे आरोग्य केंद्रात तपासणीसाठी येणारे रुग्ण, लहान बाळांचे लसीकरण, कोरोना तपासणी तसेच आरोग्य कर्मचाऱ्यांना बसण्यासाठी जागा नाही. आरोग्य केंद्रात प्रसूती, कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करता येत नाहीत.
-डॉ. योगेश कर्डिले, वैद्यकीय अधिकारी, जेऊर आरोग्य केंद्र
.............
जेऊर प्राथमिक आरोग्य केंद्राच्या नूतनीकरणाचे काम अत्यंत संथ गतीने सुरू आहे. तसेच काम निकृष्ट दर्जाचे होत असल्याच्या तक्रारी येत आहेत. कामात सुधारणा न केल्यास ग्रामस्थांच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल.
-श्रीतेश पवार, उपसरपंच जेऊर
............
या कामाचा दर्जा निकृष्ट असल्याच्या अनेक तक्रारी आलेल्या आहेत. कामही संथगतीने सुरू आहे त्यामुळे संबंधित ठेकेदाराला काळ्या यादीत टाकून त्याच्यावर कारवाई करावी. तसेच आरोग्य केंद्राचे काम ज्या शासकीय अभियंत्यांच्या देखरेखीखाली सुरू आहे त्यांच्यावरही कडक कारवाई करावी.
-गोविंद मोकाटे, माजी पंचायत समिती सदस्य