आढळगाव : राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५४८ डीचे रुंदीकरण आणि दर्जोन्नतीकरणाचे काम प्रगतिपथावर आहे. न्हावरा ते आढळगाव दरम्यान ४८.४५० किलोमीटर रस्त्याचे सिमेंट काँक्रिटीकरण होत आहे. श्रीगोंदा शहरातून जाणारा हा पहिलाच राष्ट्रीय महामार्ग असून तालुक्याच्या विकासात भर टाकणारा ठरणार आहे.
न्हावरा-इनामगाव-काष्टी-श्रीगोंदा-आढळगाव-माहीजळगाव-जामखेड या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५४८डीमधील न्हावरा ते आढळगाव या पहिल्या टप्प्याचे काम राष्ट्रीय महामार्गाच्या नाशिक विभागांतर्गत अहमदनगर उपविभागाच्या देखरेखीखाली सुरू आहे. तत्कालिन खासदार दिलीप गांधी यांच्या विशेष प्रयत्नातून २०१९ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी या महामार्गाच्या कामाला मंजुरी मिळविली होती. केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांनी मंजुरीची घोषणा केली होती. भाजप नेते माजी मंत्री बबनराव पाचपुते यांनीही गडकरी यांच्याकडे पाठपुरावा केला होता. लोकसभा निवडणुकीपूर्वी या कामाचे टेंडर झाले होते. पुणे जिल्ह्यात २६ किलोमीटर तर अहमदनगर जिल्ह्यात २२.४५० किलोमीटर काम होत आहे. काष्टीजवळ घोड नदीवर मोठ्या पुलासह ठिकठिकाणी छोट्या-मोठ्या पुलांचे काम सुरू असून, घोड आणि कुकडीच्या चाऱ्यांसाठी आवश्यक ठिकाणी पूल केले आहेत.
वाहतुकीच्या सोईसाठी रस्त्याचे वळण कमी करण्यात आले असून, चढ-उतार समतल केल्यामुळे अपघातांचा धोका कमी होणार आहे. लिंपणगाव जवळील रेल्वे गेटवर सध्याचा रस्ता जोडण्यात येणार असला तरी केंद्र सरकारच्या वार्षिक योजना २०२१-२२ मध्ये याठिकाणी उड्डाणपूल मंजुरीसाठी समावेश केला आहे. या महामार्गाचे श्रीगोंदा शहरामध्ये ३.३० किलोमीटर काम होत आहे. या मार्गाचे नुकतेच नगर परिषदेकडून डांबरीकरण आणि रुंदीकरण करण्यात आले होते. या रस्त्यावर पुन्हा दर्जेदार डांबरीकरण करून त्यावर सिमेंट काँक्रिटीकरण करण्यात येणार आहे. शहरातील सरस्वती नदीवरील जुनेच पूल सध्या वापरात आणण्याने राष्ट्रीय महामार्ग विभागाचे नियोजन आहे.
---
दृष्टीक्षेपात महामार्ग..
क्रमांक ५४८ डी :
न्हावरा ते आढळगाव (पहिला टप्पा).
एकूण खर्च- २१६.५१ कोटी. एकूण लांबी- ४८.४५० किलोमीटर.
एकूण रुंदी- १० मीटर.
साईडपट्टी- २ मीटर (दुतर्फा).
ठेकेदार कंपनी- मे. राजेंद्र सिंग भांबू एन्फ्रा प्रायव्हेट लिमिटेड, जयपूर. टोलनाका (प्रस्तावित) : पिंपळसुटी (जि. पुणे)
देखभाल कालावधी -१० वर्षे.
---
न्हावरा ते आढळगाव दरम्यानचे काम सुरू असून, ठेकेदार कंपनीला कोरोनाच्या संकटामुळे सहा महिन्यांची मुदतवाढ देण्यात आली आहे. काम वेळेत पूर्ण होऊन वाहतुकीसाठी दर्जेदार महामार्ग देण्याचे प्रयत्न आहेत.
-दिलीप तरडे,
उपअभियंता, राष्ट्रीय महामार्ग उपविभाग
---
२४ नॅशनल हायवे
राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५४८ डीचे न्हावरा ते आढळगाव यादरम्यान सुरू असलेले काम.