अहमदनगर : जिल्ह्यातील तलाठी व मंडल अधिकारी मंगळवारी संपावर गेले आहेत़ त्यामुळे जिल्ह्यातील तलाठी कार्यालयांचे कामकाज ठप्प झाले आहे़ परिणामी नागरिकांना मिळणारे सातबारे, फेरफार आणि आठ अ ही महत्वाची कागदपत्रे मिळणे बंद झाल्याने नागरिकांची चांगलीच गैरसोय झाली आहे़सरकारकडून बहुतांश सेवा आॅनलाईन करण्यात आल्या आहेत़ मात्र, त्यासाठी लागणाऱ्या आवश्यक सुविधा पुरविल्या गेल्या नाहीत़ त्यामुळे गावोगावी आॅनलाईन सेवा पुरविणे कठीण झाले आहे़ वारंवार मागणी करूनदेखील सुधारणा न झाल्याने नागरिकांच्या रोषाला तलाठी व मंडल अधिकाऱ्यांना सामोरे जावे लागते़ अखेर तलाठी व मंडल अधिकाऱ्यांनी कनेक्टीव्हीटी या प्रमुख मागणीसाठी संपाची हाक दिली असून, राज्यभरातील तलाठी संपावर गेले आहेत़ या पार्श्वभूमीवर नगर जिल्ह्यातील ५८३ तलाठी कार्यालये तलाठ्यांनी सकाळपासूनच बंद ठेवले़ कार्यालये उघडलीच नाहीत़ कार्यालये बंद ठेवून तलाठ्यांनी सातबारा देणे, त्यावर बोजा चढविणे, कमी करणे, फेरफार देणे, आठ अ वितरीत करणे, ही कामे केली नाहीत़ त्यामुळे गावातील ही सेवा पूर्णपणे कोलमडली असून, त्याचा फटका सर्वसामान्यांना बसत आहे़ आॅनलाईन सातबारा ही सेवा सुरू झाली़ मात्र, त्यासाठी आवश्यक सुविधा पुरविण्यात सरकार उदासीन आहे़ ग्रामीण भागात १२ तासांचे भारनियमन आहे़ तासन्तास नेट कनेक्टीव्हीटी मिळत नाही़ तालुकास्तरावर तांत्रिक कर्मचाऱ्यांची नियुक्तीदेखील करण्यात आली नाही़ त्यामुळे या सेवेचा अल्पावधीतच बोजवारा उडाला़ त्याचा तलाठी व मंडल अधिकाऱ्यांना त्रास होत असल्याने त्यांनी संपाचे हत्यार उपसले आहे़ जोपर्यंत सरकार यासंदर्भात निर्णय घेत नाही, तोपर्यंत हा संप सुरूच ठेवणार असल्याची भूमिका संघटनेने घेतली आहे़ त्यामुळे ग्रामीण भागातील शेतीशी संबंधीत व्यवहार ठप्प होण्याची शक्यता आहे़ (प्रतिनिधी)डिजिटल सिग्नेचर सरकारजमामाहिती व तंत्रज्ञान विभागाकडून जिल्ह्यातील सर्व तलाठ्यांना डिजिटल सिग्नेचर पुरविण्यात आले होते़ लॅपटॉपला जोडल्यानंतर नागरिकांना डिजिटल स्वाक्षरी असलेला सातबारा मिळतो़ ते तलाठ्यांनी जिल्हा प्रशासनाकडे जमा केले आहेत़ग्रामीण भागात कनेक्टीव्हीटी मिळत नाही़ त्यामुळे काम करणे कठीण झाले आहे़ वारंवार मागणी करूनदेखील सुधारणा झाली नाही़ त्यामुळे संघटनेने संपाचा निर्णय घेतला असून, जिल्ह्यातील सर्व तलाठी कार्यालये बंद करण्यात आली आहेत़ हा संप बेमुदत असून, जोपर्यंत निर्णय होत नाही, तोपर्यंत संप सुरूच राहील़-दिनकर घोडे, सदस्य- राज्य कार्यकारी तलाठी संघ
आॅनलाईन सातबारा वितरणाचे काम ठप्प
By admin | Published: April 26, 2016 11:16 PM