जागतिक पर्यटन दिन विशेष/ सुहास पठाडे़/ नेवासा : संत ज्ञानेश्वरांनी सुमारे सातशे वर्षांपूर्वी नेवासा येथील अमृतवाहिनी प्रवरेकाठी असलेल्या मंदिरातील पैस खांबाला टेकूनच ज्ञानेश्वरी सांगितली. याच पवित्र भूमीवर पूर्वी करवीरेश्वराचे मंदिर होते. त्याच मंदिरातील खांबाला (पैस) टेकून संत ज्ञानदेवांनी ज्ञानेश्वरी, अमृतानुभव ग्रंथांची निर्मिती केली. जगाला दिव्य संदेश देणारा पैस खांब आजही अबाधित आहे. नेवासा वारकरी संप्रदायाचे हे आदिपीठ असले तरी अनेक वर्षांपासून तीर्थक्षेत्र विकासाबाबत दुर्लक्षितच आहे.संत ज्ञानेश्वर मंदिराचा पंढरपूर, देहू, आळंदी तीर्थक्षेत्र विकास आराखड्यात समावेश आहे. समावेश झाल्यापासून १५ कोटीच्या आसपास निधी मंजूर झाला. मात्र एक दोन कामे वगळता ठोस अशी कामे झालेली नाहीत. मागील तीन वर्षांपासून ही कामे पूर्णपणे ठप्प आहेत.संत ज्ञानेश्वर महाराज मंदिरात वर्षभर हजारों वारकरी, दर्शनासाठी येतात. आषाढी वद्य व कार्तिकी वद्य एकादशीला या ठिकाणी राज्यातून लाखों भाविक येतात. दरवर्षी या मार्गावरून आळंदी, पंढरपूरकडे जाणा-या वारक-यांच्या अनेक दिंड्या माउलींच्या दर्शनासाठी येतात. मात्र येथे सुविधांचा अभाव आहे. ज्ञानेश्वर मंदिर रस्ता, सुविधा केंद्र, उद्यानाची कामे काही प्रमाणात झाली आहेत. रस्त्यावर दुभाजक, सोलर विद्युतीकरण (पथदिवे), पथरस्ता व संत ज्ञानेश्वरांचा जीवनपट, ज्ञानेश्वरीवर आधारित चित्रे, ध्वनिफित ही प्रकल्पाची महत्त्वाची मंदिर व शहराच्या विकासाला चालना देणारी कामे रखडली आहेत. तीर्थक्षेत्र विकासनिधीतून उभारण्यात आलेल्या संत ज्ञानेश्वर उद्यानाची सुरक्षा सध्या रामभरोसे आहे. उद्यानातील पथदिव्यांची काही महिन्यांपूर्वी मोडतोड झाली आहे. उद्यानात तयार असलेल्या नऊ चौथºयांवर माउलीच्या जीवनपटावरील घटनाशिल्पे साकारण्यात येणार होती. त्याचे कामही अद्याप सुरू झालेले नाही. संरक्षणभिंतीसह सुरक्षारक्षकाची अत्यंत गरज या उद्यानाच्या रक्षणासाठी असली तरी याकडे मात्र सर्वांचेच दुर्लक्ष होताना दिसत आहे. प्रकल्पातील रखडलेल्या कामाची माहिती घेऊन उद्यानासह रस्त्याची कामे त्वरित पूर्ण करण्याचे आदेश जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी मागील वर्षी दिलेल्या भेटी दरम्यान दिले होते. मात्र त्यानंतरही काम सुरू झाले नाही. सदरचे रखडलेल्या रस्त्याच्या कामाबाबत ठेकेदाराची चौकशी झाली व त्याच्या कामात दिरंगाई केल्याबद्दल १० लाख रुपये दंड या ठेकेदाराकडून वसूल करण्यात येणार आहे, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले. मात्र ठप्प झालेले कामे केव्हा आणि कशी पूर्ण होणार हा खरा प्रश्न आहे.माहिती मिळत नसल्याची विश्वस्त मंडळाची तक्रारतीर्थविकास कामांबाबत आजपर्यंत कुठल्याही प्रकारची कागदपत्रे व माहिती संस्थानला दिली जात नाही. कुठल्या कामाला किती निधी आहे हे काही कळत नाही. तसेच अधिकारी ही कामाकडे लक्ष देत नाही. तसेच उद्यानातील संरक्षण भिंत त्वरित उभारावी, अशी मागणी मागील वर्षापासून विश्वस्त मंडळ करत आहे.
नेवासा येथील संत ज्ञानेश्वर मंदिराची कामे ठप्पच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2019 5:24 PM