अहमदनगर : पारनेरच्या तहसीलदार ज्योती देवरे यांच्या मनमानी कारभाराला कंटाळलो असल्याचे सांगत पारनेर तहसील कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी बुधवार (दि. २५)पासून बेमुदत कामबंद आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. देवरे यांच्यासोबत काम करणे अशक्य असल्याने त्यांची तातडीने बदली करण्याची मागणी कर्मचाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांसह वरिष्ठ अधिकाऱ्यांना पाठविलेल्या निवेदनात केली आहे.
तहसीलदार देवरे यांची क्लिप समाजमाध्यमांवर प्रसारित झाल्यानंतर तहसील कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, महसूल मंत्री, विरोधी पक्षनेते, विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी यांना शनिवारी (दि. २१) निवेदन पाठविले आहे. यात म्हटले आहे की, देवरे यांच्याविरुद्ध याआधी जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रारी करण्यात आल्या होत्या. प्रांताधिकारी यांच्या सूचनेप्रमाणे कर्मचाऱ्यांनी २५ मे २०२१ रोजीच पुरावे सादर केले होते; मात्र आमदार नीलेश लंके आणि प्रांताधिकारी सुधाकर भोसले यांनी मध्यस्थी करीत कोरोना परिस्थितीमुळे कर्मचाऱ्यांनी आंदोलन करू नये, असे ठरले होते; मात्र आता देवरे यांच्यासोबत काम करणे अशक्य झाले असल्याचे निवेदनात म्हटले आहे.
---
कर्मचाऱ्यांनी निवेदनात केलेले आरोप
देवरे यांच्या निर्णयाविरुद्ध उपोषण करणाऱ्या संपत आंधळे यांच्या प्रकरणात कर्मचाऱ्यांवर दबाव टाकण्यात आला होता. देवरे यांच्या दबावाला बळी न पडणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात आली होती. या प्रकरणातील संचिका गायब करून कर्मचाऱ्यांनाच अडचणीत आणण्याचे प्रकार देवरे यांनी केले होते. विविध प्रकरणातील कारवाईबाबतच्या कर्मचाऱ्यांनी दिलेल्या संचिका देवरे यांनी परत केलेल्या नाहीत. कर्मचाऱ्यांनी दिलेल्या कोणत्याही प्रस्तावावर देवरे निर्णय घेत नाहीत. त्यामुळे मंडलाधिकाऱ्यांना जनतेच्या रोषाला सामोरे जावे लागते. कारवाई झालेल्या वाळूच्या वाहनांवर दंड न करता ती सोडून दिल्याने शासनाचा कोट्यवधी रुपयांचा महसूल बुडाला आहे. देवरे या कर्मचाऱ्यांना चांगली वागणूक देत नाहीत. महिलांना रात्री-अपरात्री बैठकांना बोलविले जाते, असाही आरोप कर्मचाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना पाठविलेल्या निवेदनात केला आहे.