अहमदनगर: विधानसभा निवडणुकीत कोणत्याही परिस्थितीत यश मिळविण्यासाठी सर्व पक्षाचे नेते कामाला लागले आहेत. लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर सर्वांनीच तरूणाईवर लक्ष केंद्रीत केले आहे. निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्यापूर्वी सुरू झालेल्या संवाद मेळावे, युवा मेळावे यामुळे निवडणुकीची रणधुमाळी पेटल्याचे चित्र आहे. सर्वच पक्षाकडून प्रचाराआधी कार्यकर्त्यांची जुळवणी सुरू झाल्याचे या निमित्ताने दिसून येत आहे. विधानसभा निवडणुका सर्व पक्षांसाठी प्रतिष्ठेच्या आहेत. महायुतीने लोकसभा निवडणुकीत मिळविलेल्या यशाने त्यांच्या आशा उंचावल्या आहेत. तर काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी विकास कामांच्या जोरावर आपली सत्ता राखण्यासाठी सज्ज झाली आहे. लोकसभा निवडणुकीत निर्णायक ठरलेल्या तरूण मतदारांच्या मनाचा वेध घेण्याचा प्रयत्न सर्वांकडून होतांना दिसत आहे. यासाठी तरूणांचे मेळावे, संवाद यात्रा सुरू झाल्या आहेत. यातून कार्यकर्त्यांची जुळवणी होतांना दिसत आहे. जिल्ह्यातही महिनाभरापासून निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाल्याचे दिसत आहे. सत्ताधारी आणि विरोधक मेळावे, सभा यांच्या माध्यमातून कार्यकर्त्यांना एकत्र आणत निवडणुकीची दिशा स्पष्ट करतांना दिसत आहेत. शेवगावच्या मेळाव्यात माजी आमदार नरेंद्र घुले यांनी यंदाची निवडणूकही तरुणांच्या ताकदीवर लढवायची आहे. भविष्यात सर्व संस्थांमध्ये तरूणांना ५० टक्के प्रतिनिधीत्व देण्यात येणार आहे. राजकारणात तरूणांचे स्थान महत्वाचे आहे, असे सांगत तरुणांना सोबत येण्यासाठी साद घालतांना दिसले. नेवासा तालुक्यातही आ. शंकरराव गडाख यांनी तरूणांचे दोन मेळावे घेतले. त्यांनी केलेल्या विकास कामांचा लेखा जोखा मांडतांना विरोधकांना आव्हान दिले.श्रीगोंद्यात राहुल जगताप यांनी थेट मैदानात उडी घेत, सत्ताधाऱ्यांना आपला मनसुबा दाखवून दिला. घन:श्याम शेलार यांनी निर्धार मेळाव्याच्या माध्यमातून आपली दिशा स्पष्ट आहे. काही ठिकाणी धार्मिक कार्यक्रमाच्या माध्यमातून मतदार,कार्यकर्त्यांची जुळवाजुळव सुरू आहे. हे करत असतांना कार्यकर्त्यांना प्रोत्साहनासाठी सत्ताधारी आणि विरोधक दोघेही आक्रमक झालेले आहे. विकासाच्या नावाखाली मतदारसंघ कसा भकास केला यावर भाषणबाजी सुरू आहे. यामुळे राजकीय वातावरण तापू लागले आहे. (प्रतिनिधी)
प्रचाराआधीच कार्यकर्त्यांची जुळवणी
By admin | Published: August 10, 2014 11:13 PM