अहमदनगर : लॉकडाऊनंतर मोठ्या कंपन्यांनी घटविलेले उत्पादन आणि कच्चा मालाचा तुटवडा, कामगारांना कोरोनाची लागण होण्याची भीती असली तरी नगरच्या एमआयडीसीत ३०३ कारखाने सुरु झाले आहेत. परंतु कामगारांना दोन दिवस कामावर तर पाच दिवस सुटी दिली जात आहे.
अद्याप कारखान्यांचे चाक पूर्ण क्षमतेने धावू लागलेले नाही़ मोठ्या कंपन्यांमधील काम सुरळीत नसल्यामुळे त्यांच्यावर अवलंबून असलेल्या छोट्या कंपन्यांही हत्तीच्या गतीने सुरु आहेत़ नागापूरसह जिल्ह्यात बोटावर मोजण्या इतक्याच मोठ्या कंपन्या आहेत़ मोठ्या कंपन्यांवर अनेक लहान कंपन्या अवलंबून असतात़ राज्य सरकारने कारखाने सुरू करण्यास परवानगी दिली़ जिल्ह्यातील लहान, मोठे ३०३ कारखाने सुरू झाले आहेत़ परंतु मोठ्या कंपन्यांकडून आॅर्डर मिळणे अजून सुरू झालेले नाही़ इतर पुणे, औरंगाबाद आणि नाशिक येथील मोठ्या कंपन्यांनी सध्या उत्पादनात घट केलेली आहे़ त्यामुळे त्यांच्याकडूनही आॅर्डर मिळत नाहीत़ याशिवाय लहान कंपन्यांना कच्चा माल लागतो़ तो सध्या मिळत नाही़ त्यामुळे कामगारांना काम उपलब्ध होत नाही.
मोठ्या कंपन्यांकडून आॅर्डर मिळणे अजून सुरू झालेले नाही़ लहान कंपन्यांनी उत्पादन करून ठेवण्याचा निर्णय घेतला़ पण, कच्चा माल मिळत नाही़ वाहतूक बंद आहे़ कामगारांची तुटवडा आहेच़ यामुळे कारखाने सुरळीत सुरू होऊ शकलेले नाहीत़, असे आमी संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र कटारिया यांनी सांगितले.