अहमदनगर : राहुरीच्या डॉ. बाबुराव बापूजी तनपुरे सहकारी साखर कारखान्याच्या कामगारांनी सोमवारी थकीत पगारासाठी नगरच्या सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयावर मोर्चा काढत धरणे आंदोलन केले. यावेळी सहाय्यक कामगार आयुक्त यांनी तीन दिवसात कामगारांच्या पगारासाठी संचालक मंडळावर गुन्हे दाखल करण्याचे आश्वासन दिले असल्याची माहिती राज्य साखर कामगार संघटनेचे सचिव कॉ. आनंद वायकर यांनी दिली. राहुरी साखर कारखान्याच्या कामगारांचा पगार ३८ महिन्यांपासून थकलेला आहे. जिल्हा मध्यवर्ती बँकेकडून वेळोवेळी कामगारांच्या पगारासाठी रक्कम मिळूनही कामगारांच्या पदरात अद्याप काहीच पडलेले नाही. यामुळे कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे. कारखान्यातून सेवानिवृत्त झालेल्या कामगारांच्या भविष्य निर्वाहनिधीची रक्कमही व्यवस्थापनाने भरलेली नाही. सहा वर्षापूर्वी सेवानिवृत्त झालेल्या कामगारांची ग्रॅच्युईटीची रक्कम संबंधितांना मिळालेली नाही. साखर कामगारांच्या वेतन व सेवा शर्तीसाठी नेमलेल्या शिवाजीराव पाटील यांच्या अध्यक्षतेखालील त्रिपक्षीय समितीच्या निर्णयाप्रमाणे २००७ च्या कराराप्रमाणे १५ टक्के फरकाची उर्वरित रक्कम व जुलै २०११ मध्ये नेमलेल्या त्रिपक्षीय समितीच्या निर्णयाप्रमाणे १८ टक्के फरकाची रक्कम व्यवस्थापनाने कामगार संघटनेबरोबर करार करूनही दिलेली नाही. हंगामी कामगारांचा दोन हंगामाचा रिटेन्शन भत्ता वेळोवेळी मागणी करूनही व्यवस्थापनाने दिलेला नाही. कामगारांच्या पगारातून कपात केलेली पतपेढीची रक्कमही व्यवस्थापनाने पतपेढीकडे भरणा केली नाही. ही रक्कम ४ कोटी ७५ लाख असून थकीत पगाराची रक्कम ३९ कोटी असून भविष्यनिर्वाह निधीची रक्कम २ कोटी ४५ लाख रुपये आहे. अन्य देण्यांसह कामगारांचे देणे ५९ कोटी आहे. हे देणे तातडीने मिळावे, यासाठी आंदोलन करण्यात आले. आंदोलनाचे नेतृत्व राज्य साखर फेडरेशनचे सचिव बबनराव पवार यांनी केले. यावेळी अप्पासाहेब गावडे, बाळासाहेब म्हस्के, सुधीर आहेर, सुरेश थोरात, सोमनाथ वाकडे, सुधीर कराळे, सोमनाथ वाकडे, कारभारी खुळे, चंद्रकांत कराळे आदी सहभागी झाले. सहाय्यक कामगार आयुक्त यांनी कामगारांच्या पगारासाठी संचालक मंडळावर तीन दिवसात गुन्हे दाखल करण्याचे आश्वासन दिले आहे. देणी देण्यासंदर्भात पुढील आठवड्यात बैठक राहुरी : शेतकरी व कामगारांची देणी देण्यासंदर्भात संचालक मंडळाची बैठक पुढील आठवड्यात घेण्यात येईल, अशी माहिती डॉ़ बा़ बा़ तनपुरे साखर कारखान्याचे उपाध्यक्ष सुरेश वाबळे यांनी दिली. आर्थिक संकटात सापडलेल्या तनपुरे साखर कारखान्याला बाहेर काढण्यासाठी संचालक मंडळाचे प्रयत्न सुरू आहेत़ ऊस उत्पादक शेतकरी व कामगारांची देणी थकल्यामुळे कारखान्यापुढे पेच निर्माण झाला आहे़ यासंदर्भात उपाध्यक्ष सुरेश वाबळे म्हणाले की, अध्यक्ष प्रसाद तनपुरे यांच्या मार्गदर्शनाखाली मार्ग काढण्याचा प्रयत्न सुरू आहे़ कर्ज उपलब्ध व्हावे म्हणून प्रयत्न सुरू आहेत़ संचालक मंडळाला बरोबर घेऊन यासंदर्भात योग्य निर्णय घेण्यात येईल, असे सुरेश वाबळे यांनी सांगितले़ कर्ज उपलब्ध व्हावे यासंदर्भात अजून संचालक मंडळाची बैठक झालेली नाही़ अर्थसहाय्य उपलब्ध झाल्यानंतर प्रसारमाध्यमांना माहिती देण्यात येईल, असे वाबळे यांनी स्पष्ट केले. विश्रामगृहावर संचालक मंडळाचा स्नेहमेळावा आयोजित केला होता. ती बैठक नव्हती. त्यानिमित्त अध्यक्ष प्रसाद तनपुरे यांच्याशी संवाद साधला़ कारखान्याला उस उत्पादक व कामगारांचे देणे आहे़ साखर शिल्लक नाही, मग एवढी रक्कम देणार कशी, अशी विचारणा तनपुरे यांना केली़ - शिवाजीराव गाडे, विरोधी संचालक, तनपुरे कारखाना
‘राहुरी’च्या कामगारांचे धरणे
By admin | Published: May 19, 2014 11:46 PM