अहमदनगर : शेतकरी खरीप हंगामात समाधानी झाला पाहिजे. गाव पातळीवर काम करणा-या सर्व शासकीय कर्मचा-यांनी सकारात्मक व माणुसकीचा दृष्टिकोन ठेवून काम करा, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी केले.कृषी विभागाच्या वतीने पंतप्रधान पीकविमा योजना कार्यशाळेप्रसंगी जिल्हाधिकारी द्विवेदी बोलत होते. यावेळी प्रभारी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विलास नलगे, सेंट्रल बँक आॅफ इंडियाचे रिजनल मॅनेजर एन. के. पंडा, तालुका कृषी अधिकारी बाळासाहेब नितनवरे, जिल्हा समन्वयक विनायक पवळे उपस्थित होते. द्विवेदी पुढे म्हणाले, सर्व बँकांनी दिलेल्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे. बँकेच्या कामामुळे शेतकऱ्यांच्या रोषाला शासकीय यंत्रणेला सामोरे जावे लागते.जे उद्दिष्ट दिले आहे, ते पूर्ण करा. पीककर्ज संबंधित एकही प्रस्ताव बाकी ठेवू नये. ज्या बँका काम करणार नाहीत, त्यांच्यावर योग्य ती कारवाई केली जाईल.नैसर्गिक आपत्ती, कीड आणि रोगासारख्या प्रतिकूल परिस्थितीमुळे पिकांचे नुकसान झाल्यास शेतकºयांना विमा संरक्षण देणे, पिकांच्या नुकसानीच्या अत्यंत कठीण परिस्थितीतही शेतकºयांचे आर्थिक स्थैर्य अबाधित राखणे, असे प्रधानमंत्री योजनेचे उद्दिष्ट असल्याचे ते म्हणाले.प्रास्ताविकात प्रभारी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विलास नलगे म्हणाले की, या योजनेंतर्गत वास्तवदर्शी दराने हप्ता आकारण्यात येणार असून, शेतकºयांवरील विमा हप्त्याचा भार कमी करण्यासाठी शेतकºयांनी भरावयाचा विमा हप्ता दर खरीप हंगाम २ टक्के व रब्बी हंगाम दीड टक्के , तसेच नगदी पिकांसाठी ५ टक्के असा मर्यादित ठेवण्यात आला आहे. अॅग्रीकल्चर इन्शुरन्स कंपनी आॅफ इंडिया लिमिटेड व बजाज इन्शुरन्स कंपनीच्या माध्यमातून पंतप्रधान पीकविमा करून घेतला जाणार आहे. पीकविमा प्रस्ताव बँकेत सादर करतेवेळी सर्व बिगर कर्जदार शेतकºयांनी आपला अर्ज आॅनलाईन भरणे बंधनकारक आहे.
कर्मचा-यांनी शेतकरी हितासाठी काम करावे : राहुल द्विवेदी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2019 12:01 PM