अहमदनगर : प्रलंबित मागण्यांसाठी बांधकाम कामगारांनी मंगळवारी केलेल्या आंदोलनाची कामगार उपायुक्तांनी तातडीने दखल घेत मागण्यांची पूर्तता करण्याचे आश्वासन दिले आहे़ नगर येथील आंदोलनाची माहिती मिळताच उपायुक्त जे़जी़ दाभाडे यांनी मंगळवारी रात्री नगरमध्ये दाखल होत कामगार नेत्यांशी चर्चा केली़ सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयाने कामगार नोंदणीत केलेला घोळ त्यांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर दाभाडे यांनी संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांची चांगलीच खरडपट्टी काढून सर्व अर्ज तपासणीचे आदेश दिले आहेत़ बांधकाम कामगारांनी मंगळवारी कॉ़ बाबा़ आरगडे, कॉ़ अजित नवले यांच्या नेतृत्वाखाली कामगार कार्यालयावर मोर्चा काढून गेट तोडून टाळे ठोकले होते़ या आंदोलनाबाबत नाशिक विभागाचे कामगार उपायुक्त दाभाडे यांना माहिती देण्यात आली होती़ दाभाडे यांनी या घटनेची दखल घेत तातडीने ते नगरला दाखल झाले़ त्यांनी आरगडे, नवले, हमाल पंचायतीचे अध्यक्ष अविनाश धुले, डॉ़ करण घुले व बहिरनाथ वाकळे यांच्याशी चर्चा केली़ यावेळी कामगार नेत्यांनी तब्बल पाच हजार पेक्षा जास्त कामगारांनी कामगार नोंदणीचे शुल्क भरूनही त्यांना २०१३ पासून शुल्क पावत्या देण्यात आलेल्या नाहीत़ त्यामुळे त्यांनी विविध योजनांसाठी सादर केलेल्या प्रस्तावांना मंजुरी मिळाली नसून ते शासकीय योजनांपासून वंचित असल्याचे निदर्शनास आणून दिले़ तसेच तब्बल सात हजार कामगारांचे विविध योजनांचे प्रस्ताव गेल्या सहा ते सात वर्षांपासून कार्यालयात पडून आहेत़ याबाबत कामगार कार्यालयाने कुठलीही तत्परता दाखविलेली नाही़ आदी बाबी दाभाडे यांच्या निदर्शनास आणून देण्यात आल्या़ यावर दाभाडे यांनी संंबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांना विचारणा करत सर्व प्रस्तावांची तपासणी करून शुल्क पावत्या देण्याचे आदेश दिले़ तसेच कामचुकारपणा करणाऱ्या अधिकाऱ्यांची कानउघाडणी केली़
कामगार उपायुक्तांनी घेतली आंदोलनाची दखल
By admin | Published: July 06, 2016 11:29 PM