अकोले : तालुक्यातील कोंभाळणे येथे झालेल्या जळीतकांडात ज्या कुटुंबांच्या संसाराची राखरांगोळी झाली, त्या कुटुंबांना राज्यातून मदतीचा ओघ सुरू झाला आहे. त्यामुळे त्यांचे संसार पुन्हा सावरू लागले आहेत. सोमवारी जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष सीताराम गायकर व राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी या कुटुबांची भेट घेतली. यावेळी गायकर यांनी या कुटुंबियांना २१ हजार रुपयांची रोख रक्कम देऊन मदत दिली.
चार दिवसांपूर्वी कोंभाळणे येथे लागलेल्या आगीत गावंडे, पथवे, मेंगाळ या कुटुंबियांच्या घरांची राखरांगोळी झाली होती. त्यामुळे या कुटुंबातील नागरिकांच्या अंगावर फक्त कपडे शिल्लक राहिले होते. त्यांचा सर्व संसार जळून भस्मसात झाला. या आदिवासी कुटुंबांची गायकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी कोंभाळणे येथे जाऊन भेट घेतली. यावेळी महिनाभर पुरेल इतका किराणा व २१ हजार रुपयांची रोख रक्कम गायकर यांनी या कुटुंबांकडे सुपूर्द केली. या कुटुंबांच्या घराच्या शेडसाठी अगस्ती साखर कारखान्याकडून मदत केली जाईल, असे आश्वासनही गायकर यांनी दिले.
यावेळी प्रकाश मालुंजकर, अशोक देशमुख, भीमसेन ताजणे, महेश नवले, प्रताप देशमुख, भानुदास तिकांडे, नीलेश गायकर, सचिन दराडे, आदी उपस्थित होते.
अग्नीकांडातील पीडित कुटुंबांना सावरण्यासाठी आदिवासी ठाकर समाज संघटनांनी पुढाकार घेतला आहे. विद्यमान आमदार व माजी आमदार यांनी पीडित कुटुंबांची भेट घेऊन दिलासा दिला.
----------
‘त्या’ चिमुकल्याच्या चेहऱ्यावर पुन्हा हास्य
या आगीत ‘त्या’ कुटुंबातील चिमुकल्याची सायकल खाक झाली होती. त्यानंतर त्या जळालेल्या सायकलच्या सांगाड्याकडे पाहात अस्वस्थ झालेल्या त्या मुलाचे फोटो सोशल मीडियात व्हायरल झाले होते. हे फोटो पाहून खासदार सुप्रिया सुळे, मंत्री बच्चू कडू, श्रीगोंद्याचे अंग्नीपंख फाऊंडेशन आदींमार्फत पाच-सहा सायकली या वस्तीवर भेट म्हणून दाखल झाल्या आहेत. या सायकल पाहून या चिमुकल्याच्या चेहऱ्यावर पुन्हा हास्य फुलले आहे.
----------
फोटो - ०५ गायकर मदत
कोंभाळणे येथे झालेल्या जळीतकांडातील कुटुंबियांना सोमवारी जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष सीताराम गायकर व राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी मदत सुपूर्द केली.
------
०५ सायकल