अहमदनगर : डॉ. सुजय विखे दुपारी भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. विखे यांच्या भाजप प्रवेशाला भाजपमधून जोरदार विरोध सुरु झाला आहे. त्याचवेळी विखे यांचे समर्थकही भाजपमधील प्रवेशाबाबत चिंताजनक असून, विखेंसमोरच काही कार्यकर्त्यांनी नव्या पक्षात गेल्यानंतर पुढील वाटचालीबाबत काळजी व्यक्त केली.नगरजवळील विळद घाट येथील विखे यांच्या कार्यालयात डॉ. सुजय विखे यांनी निवडक कार्यकर्त्यांसोबत बैठक घेतली. या बैठकीत विखे म्हणाले, उद्या १२ वाजता पुढील चित्र स्पष्ट होईल. आपण सर्वजण मुंबईत जाणार आहोत़ मात्र, मुंबईत शक्तीप्रदर्शन करायचे नाही. एकाच गाडीत निवडक कार्यकर्त्यांसह मुंबईला जाणार आहे, असे विखे यांनी कार्यकर्त्यांना सांगितले.दरम्यान भाजपमध्ये गेल्यास पुढील वाटचालीबाबत काळजी व्यक्त करीत भाजपचे वरिष्ठ नेते प्रचाराला येतील का, काही दगा तर होणार नाही ना, अशीही काळजी काही कार्यकर्त्यांनी व्यक्त केली.विखे यांच्या प्रवेशाला भाजपमधूनच जोरदार विरोध सुरु झाला आहे. सोमवारी (दि.११) मुंबई येथील भाजप कार्यालयात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोरच खासदार दिलीप गांधी यांच्या कार्यकर्त्यांनी विखे यांच्या प्रवेशाला जोरदार विरोध दर्शविला आहे.
भाजप पदाधिकाऱ्यांची मुख्यमंत्र्यांसमोर घोषणाबाजी
सोमवारी सकाळी मुबंई भाजपच्या वसंतस्मृती कार्यालयात जिल्ह्यातील भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन नगर दक्षिणमधून विद्यमान खासदार दिलीप गांधी यांनाच पुन्हा लोकसभेची उमेदवारी द्यावी, अशी मागणी करत डॉ. सुजय विखे यांच्या भाजप प्रवेशास विरोध केला. यावेळी जेष्ठ नेते आसाराम ढुस, सुनील रामदासी, शांतीलाल कोपणार, बाळासाहेब सोनवणे, विक्रम तांबे, अनिल खिळे, बबनराव डावखर,कमलेश गांधी, विजय मंडलेचा, राजेंद्र मोटे, नंदकुमार कोकाटे, अरुण जगताप, डॉ सुनील गावडे, भीमराज सागडे, गोकुळ दौंड, सुनील परदेशी, किशोर बोरा, अनिल गीते आदींसह नगर शहर, पारनेर, श्रीगोंदा, कर्जत, जामखेड, पाथर्डी, शेवगाव, राहुरी तालुक्यातील प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. गांधी यांना उमेदवारी द्यावी, अशा घोषणाबाजी गांधी यांच्या कार्यकर्त्यांनी केली.