नेवासा : गुरूंची कीर्ती व महिमा अगाध असा असून गुरूंबद्दल असलेल्या अंतकरणातील भक्तीभावाला शेवटच्या श्वासापर्यंत जपा असा संदेश श्री क्षेत्र देवगडचे महंत गुरुवर्य भास्करगिरी महाराजांनी गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने भक्त गणांसाठी बोलताना दिला.
गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने पहाटे ४ वाजण्याच्या सुमारास भगवान दत्तात्रयांसह श्री समर्थ सदगुरु किसनगिरी बाबांच्या समाधीचे तसेच पंचमुखी सिद्धेश्वर शिवलिंनाचे पूजन गुरुवर्य भास्करगिरी महाराजांच्या हस्ते करण्यात आले.आरती झाल्यानंतर गुरू वंदन केले.
भक्तांसाठी संदेश देतांना गुरूवर्य भास्करगिरी महाराज म्हणाले की भगवान दत्तात्रय हे गुरूंचे ही गुरू आहे,गुरूंची कीर्ती व महिमा अगाध असा आहे,गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने देशभर श्रद्धेने आज गुरुपूजन केले जात असून अंतकरणातील भक्तिभाव प्रत्येकजण यानिमित्ताने व्यक्त करत आहे.व्यास पोर्णिमा येथील या निमित्ताने साजरी होत आहे.
आज कोरोना सारख्या महामारीच्या आजाराने जगासह देशाला ही ग्रासले आहे,केंद्र व राज्य शासनाने नियम व बंधने घालून चांगले काम केले आहे करीत आहे,सर्वांनी शासनाने घालून दिलेले नियम सर्वांनी पाळलेच पाहिजे,या विषाणूंचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून गर्दीत करणे व गर्दीत जाणे ही सर्वांनी टाळले पाहिजे अशी अपेक्षा त्यांनी बोलताना व्यक्त केली.
या अगोदर देवगड येथे गुरुपौर्णिमा सारखा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा होत होता पण कोरोनाच्या महा मारीमुळे शासन नियमांचे पालन म्हणून मोजक्याच व्यक्तींच्या उपस्थितीत पूजापाठ करून गुरुपौर्णिमा साध्या पद्धतीने साजरी केली आहे.गुरूंबद्दल असलेला अंतकरणातील भाव हा भक्तांची श्रद्धा दृढ करतो, जीवनात येणाऱ्या अडचणी व संकटे गुरूच्या स्मरणाने दूर होते.भगवान दत्तात्रय हे गुरूंचे गुरू असून गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने घरी राहून सर्वांनी गुरुपौर्णिमा साजरी करावी
तसेच पाटावर वस्त्र ठेऊन गुरूंच्या प्रतिमा व मूर्तीचे पूजन करावे मनात ध्यान करावे पूजाअर्चा करावी मनोभावे पूजा झाल्यास वेगळा आनंद सर्वांना प्राप्त होईल असे सांगून त्यांनी गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने सर्वांना सुख शांती समाधानाची प्राप्ती होवो असा शुभाशीर्वाद त्यांनी देश व राज्यातील भक्तांना यावेळी बोलताना दिला.
कोरोनाच्या महामारीमुळे यावर्षी प्रथमच भक्तांविना गुरुपौर्णिमा देवगडला साजरी झाली.भक्तांनी दर्शनासाठी येऊ नये घरी बसूनच गुरुपौर्णिमा साजरी करावी असे आवाहन याआधीच गुरुवर्य भास्करगिरी बाबांनी भक्तगणांना केले होते त्यामुळे गुरुपौर्णिमेला एरवी गजबजलेला देवगडचा परिसर निर्मनुष्य दिसत होता मंदिर परिसरात ही शुकशुकाट दिसून येत होता.