अहमदनगर: स्टेट बँक आॅफ इंडियाला यादव टोळीने आतापर्यंत ७७ लाख ८७ हजार रुपयांना गंडविले असल्याचे समोर आले आहे़ या टोळीने केलेल्या आणखी चोऱ्या समोर येण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे़अडिच महिन्यापूर्वी स्टेट बँक आॅफ इंडियाच्या येथील मुख्य शाखेच्या एटीएममधून यादव टोळीने एटीएम मशीनमध्ये तांत्रिक बिघाड करून १८ लाख ९२ हजार चोरले़ याच दरम्यान बँकेच्या सर्जेपुरा येथील दोन एटीएममधून १२ लाख ६५ हजार रुपये लांबविले़ या दोन घटना बँक अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आल्यानंतर याप्रकरणी भिंगार कॅम्प आणि तोफखाना पोलीस ठाण्यात आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला़ दोन दिवसांपूर्वी याच टोळीने स्टेट बँकेच्या माळीवाडा, मल्हार चौक आणि झेंडीगेट येथील एटीएममधून तब्बल ४७ लाख ३० हजार ५० रुपये चोरल्याचे समोर आले आहे़ याप्रकरणी बँकेचे सहायक महाप्रबंधक मेघाश्याम मारोतराव इंजेवार यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे़ पोलिसांनी यादव टोळीचा प्रमुख विरेंद्र आयोध्याप्रसाद यादव (वय २७ रा़ धरमंगलपूर जि़ कानपूर, उत्तरप्रदेश), श्वेता कमलेश सिंग (वय २५ रा़ मुंबई) व पवन पुंडलिकराव जिवरख (रा़ कांदीवली, मुंबई) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे़ भिंगार पोलिसांनी या तिघा चोरट्यांना मुंबई येथून अटक केली होती़ हे तिघे सध्या पोलीस कोठडीत आहेत़एटीएम फोडून पैसे चोरीच्या घटना नवीन नाहीत मात्र, एटीएममध्ये तांत्रिक बिघाड करून पैसे चोरणे ही नवीनच पद्धत चोरट्यांनी आत्मसात केली आहे़ वेगवेगळ्या ग्राहकांचे एटीएम कार्ड वापरून एटीएममधून पैसे चोरणाºया टोळीत आणखी पाच जण असल्याचे भिंगार पोलिसांनी निष्पन्न केले आहे़ या टोळीने नगरमधील अनेक बँकांच्या एटीएममधून पैसे चोरल्याचा संशय पोलिसांना आहे़
यादव गँगची आणखी ४७ लाखांची चोरी उघडकीस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2019 4:27 PM