शेवगाव : येथे सुरू असलेल्या ४४ व्या कुमार राज्य अजिंक्यपद खो खो स्पर्धेत सलामीच्या साखळी सामन्यात यजमान अहमदनगर जिल्ह्याच्या मुला मुलींच्या संघासह परभणी, रत्नागिरी, बीडच्या मुलांच्या तर सोलापूर, औरंगाबाद, सातारा, सांगली, बीडच्या मुलींच्या संघाने बाद स्पर्धेत प्रवेश करण्याच्या दिशेने आगेकूच सुरू ठेवली.मुलांच्या यजमान अहमदनगर संघाने सलामीच्या सामन्यात जळगाववर एक डाव १५ गुणांनी निर्णायक मात केली. या संघाकडून कर्णधार व शेवगावचा रहिवासी तेजस मगरने अडीच मिनिटे पळती करुन विरोधी संघाचे चार गडी टिपले. प्रमोद शेंडे याने साडेतीन मिनिटे पळती करुन त्यास सुरेख साथी दिली. जळगाव संघाकडून निरंजन ढाके याने दोन गडी बाद करण्यात यश मिळविले. निलेश चव्हाणने एक मिनिट पळती करुन गडी टिपला.जालना विरुद्ध परभणी संघाच्या सामन्यात परभणीने एक डाव ७ गुणांनी दणदणीत विजय मिळविला. परभणी संघाकडून किरण राठोडने तीन गडी बाद केले. माधव खेराडेने दोन गडी बाद केले. केशव काळे (३.१० मिनिटे) याने तीन गडी बाद केले. जालना संघाकडून विष्णू मोरे याने (१.२० व २.१० मि.) पळती करुन तीन गडी बाद करण्यात यश मिळविले. रत्नागिरी विरुद्ध नांदेड संघाच्या सामन्यात रत्नागिरीने एक डाव १६ गुणांनी विजय मिळविला. रत्नागिरीच्या दीपराज कांबळेने ५ मिनिटे निर्णायक पळती केली. किरण हारदेने तीन गडी टिपले. नांदेड संघाडून रोहित केकाटेने एक गडी बाद केला. बीड विरुद्ध नंदूरबार संघातील प्रेक्षणीय सामन्यात बीड संघाने नंदूरबारवर १ डाव व १४ गुणांनी मात केली. बीड संघाकडून दीपक घोडके (३.२० व १ मि.) याने तीन गडी बाद केले. तर कृष्णा कानडेने तीन गडी बाद करुन क्रीडा रसिकांची वाहवा मिळविली. यजमान अहमदनगरच्या मुलींच्या संघाने धुळ्यावर एक डाव १३ गुणांनी दणदणीत मात करीत क्रीडाप्रेमींचे लक्ष वेधले. यजमान कर्णधार भेंडा येथील किरण गव्हाणे हिने ३ मिनिटे पळती करुन एक गडी टिपला. निकिता भुजबळने (३.३० मि.) विरोधी संघाच्या पाच गड्यांना बाद करण्यात यश मिळविले. धुळे संघाकडून चेतना माळीने एक गडी बाद केला. प्रिया पावरा हिने एक मिनिट पळती करुन एक गडी टिपला.सोलापूर विरूद्ध जालना संघातील चुरशीच्या लढतीत सोलापूर संघाने १ डाव व ३ गुणांनी दणदणीत विजय मिळविला. सोलापूरच्या जान्हवी पेठेने (४.१०मि.), व प्रियंका दासने (३.३०मि.) यांनी उत्कृष्ट खेळ केला. तर लावण्या दुस्साने तीन गडी बाद केले.जालन्याच्या शीतल प्रभाळे (२.१०मि.) हिने एक गडी बाद केला. औरंगाबाद विरुद्ध हिंगोली या अटीतटीच्या लढतीत औरंगाबादने हिंगोलीवर १ डाव व ५ गुणांनी मात केली. औरंगाबादची मयुरी पवारने (४.१०मि.) एक गडी बाद केला. ज्योती मुकाडे (२.४० मि.) हिने दोन गडी बाद केले. हिंगोलीकडून रेखा भोसले (३.१०मि.) तर पूनम केदरामने २ मिनिटे पळती करुन एक गडी बाद केला. सातारा विरूद्ध सिंधुदुर्ग जिल्हा संघातील सामन्यात साताऱ्याने १ डाव २३ गुणांनी एकतर्फी विजय संपादन केला.सातारा संघाकडून प्रतीक्षा खुरांगे (४.३० मि.)हिने ४ गडी बाद केले. मयुरी जाधवने (२.३०मि.) तीन गडी टिपले. (तालुका प्रतिनिधी)
यजमान नगरच्या संघाची आगेकूच
By admin | Published: October 15, 2016 12:31 AM