शेखर पानसरे । संगमनेर : दरवर्षी डिसेंबर, जानेवारीपासून संगमनेरातील गणेश मूर्ती बनविण्याच्या कारखान्यांमध्ये लगबग सुरू होते. मात्र, यंदा गणेशोत्सवावरही कोरोनाचे सावट आहे. त्यामुळे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांमध्ये स्थापना केल्या जाणाºया मोठ्या मूर्तिंना मागणी नाही. कारखान्यांमध्ये केवळ घरोघरी स्थापन केल्या जाणाºया मूर्ती बनविण्याचे काम सुरू आहे. संगमनेरच्या गणेशोत्सवाला १२५ वर्षांची परंपरा आहे.
बड्या शहरांसारखाच गणेशोत्सवाचा उत्साह येथेही दरवर्षी असतो. मानाच्या मंडळांसह शहर, उपनगर तसेच तालुक्यातील अनेक गावांमध्ये सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांत ‘श्रीं’च्या मूर्तीची स्थापना करण्यात येते. संगमनेर शहरातील कुंभारआळी, इतर परिसर व तालुक्यातील काही गावांमध्ये गणेश मूर्ती बनविण्याचे ३५ ते ४० छोटे-मोठे कारखाने आहेत. कुंभार समाज बांधव या कलाकुसरीच्या व्यवसायात मोठ्या संख्येने असून अनेक कुटुंबांचा उदरनिर्वाह त्यावरच चालतो. अगदी सहा इंचापासून ते दहा फुटापर्यंत मूर्ती संगमनेरात तयार होतात. येथील गणेश मूर्तींना उत्तर नगर जिल्ह्यासह, नाशिक जिल्ह्यात मोठी मागणी असते. दरवर्षी यातून दोन ते अडीच कोटींची उलाढाल होते.
व्यापारी संगमनेरात येऊन मूर्तींची बुकिंग करत असतात. मे महिन्यात गणेश मूर्तींचे मोठ्या प्रमाणात बुकिंग केले जाते. यावर्षी जूनचा दुसरा आठवडा आला तरी अद्यापही बुकिंग झालेले नाही. गणेशोत्सव अवघ्या दोन महिन्यावर आला आहे. मोठ्या मूर्तींच्या आॅर्डर अजूनही आलेल्या नाहीत.
मार्च महिना निम्मा संपल्यानंतर भारतात कोरोनाचे संकट वाढले तोपर्यंत अनेक कारखान्यांमध्ये मोठ्या मूर्ती बनविल्या गेल्या होत्या. त्यावर रंगकाम व इतर कलाकुसर बाकी आहे. परंतु मागणी नसल्याने त्या तशाच ठेवण्यात आल्या आहेत. छोट्या मूर्ती घडविण्याचे काम सुरक्षित अंतर ठेवून सुरू आहे. ग्राहकांपर्यंत त्या पोहोचविण्यासाठी मूर्तिकारांना मोठी कसरत करावी लागणार आहे.